अमरावती - वाढीव मालमत्ताकर संघर्ष समिती करणार आंदोलन
अमरावती, 25 जुलै, (हिं.स.) - नेर शहरातील नागरिकांना प्रशासनाने वाढीव कर लावून वेठीस धरले असल्याचा आरोप करून नगरपालिका वाढीव मालमत्ताकर संघर्ष समितीतर्फे तीन स्तरांवर या विरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती समितीच्या पदाधिका-यांनी आज दिली. न
अमरावती - वाढीव मालमत्ताकर संघर्ष समिती करणार आंदोलन


अमरावती, 25 जुलै, (हिं.स.) - नेर शहरातील नागरिकांना प्रशासनाने वाढीव कर लावून वेठीस धरले असल्याचा आरोप करून नगरपालिका वाढीव मालमत्ताकर संघर्ष समितीतर्फे तीन स्तरांवर या विरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती समितीच्या पदाधिका-यांनी आज दिली. नेर-नबाबपूर नगरपालिकने २०२६-२७ या वर्षासाठी अवाजवी अतिरिक्त वाढीव मालमत्ता कर लागू करण्यासंदर्भात नागरिकांना नोटीस दिल्या. या संदर्भात आक्षेप फॉर्म भरण्यास सांगितले. परंतु षडयंत्रपूर्वक अट घालून मागील मालमत्ता कर न भरणा-या नागरिकांचे आक्षेप फॉर्म नाकारले. यामुळे चौदाशे नागरिकच आक्षेप फॉर्म भरू शकले, याचा अर्थ अवाजवी मालमत्ता कर वाढीला फक्त चौदाशेच लोकांचा विरोध आहे व बाकी नागरिकांना वाढीव मालमत्ता कर मान्य आहे, असे नगर परिषदेला दर्शविण्याचे तर नाही ना, असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे. यामुळे वाढीव मालमत्ता कर विरोध संघर्ष समिती, भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून संविधानिक मार्गाने तीन चरणात आंदोलन जाहीर करण्यात आले आहे.

नेर-नबाबपूर नगरपालिकेने जाहीर केलेली अवाजवी नवीन मालमत्ता करवाढ रद्द करावी, त्या ऐवजी एकूण मागील मालमत्ता कराच्या पाच टक्के कर वाढ करावी, मालमत्ता करामध्ये शैक्षणिक कर व वृक्ष कर या संदर्भातील २०१४ पासून ते २०२६ पर्यंत नगरपरिषदेला नागरिकांकडून देण्यात आलेल्या कराची एकूण रक्कम व तो कर खर्च करण्यासंदर्भातील तपशीलवार माहिती जाहीर करावी, नळाचे बिल व मालमत्ता कर आकारणी बिल दरवर्षी नियमित फेब्रुवारीअखेर पर्यंत वेळेवर देण्यात यावे. नगर परिषदेचे वार्षिक आर्थिक नियोजन मीटिंगमध्ये स्थानिक पत्रकारांना व सामाजिक कार्यकर्त्यांना आमंत्रित करण्यात यावे. दारिद्र रेषेखालील तथा दिव्यांग नागरिकांचे मालमत्ता कर माफ करावे आणि नेर शहराला पिण्याच्या पाण्याचा शुद्ध पाणीपुरवठा नियमित करावा, अशा प्रमुख मागण्या समितीने केल्या आहेत.

शहरातील जनतेवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी हे आंदोलन असल्याचे सांगण्यात आले. या मागण्यांसाठी तीन टप्प्यात आंदोलन करण्यात येणार आहे. पहिला टप्प्यात नगरपरिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात येईल. दुस-या टप्प्यात ३१ जुलैला नेर शहरात रॅली काढण्यात येणार आहे व तिसर्!या टप्प्यात ०७ ऑगस्ट रोजी नेर बंदची हाक देण्यात आलेली आहे. नेर नगरातील सर्व नागरिकांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन विविध संघटनांकडून करण्यात आले आहे.

या आंदोलनाला बहुजन मुक्ती पार्टी, शिवसेना (उ.बा.ठा.), बहुजन वंचित आघाडी, बहुजन समाज पार्टी, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार), मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, किराणा असोसिएशन, भारतीय पिछडा ओबीसी शोषित संघटना, विदर्भ आंदोलन समिती, युवा एल्गार संघटना, मानव अधिकार संघटना, जमीयत उलेमा-ए-हिंद, व्यापारी असोसिएशन, या राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व व्यापारी संघटनांनी समर्थन जाहीर केले आहे. पत्रकार परिषदेला प्रा. मनोहर देशमुख, रजा शेख, बासित खान, सुनील गवई, जगदीश पाटील, अनिरुद्ध मुंदाने, अरविंद पाटील, अनिल कांबळे, उमेश इंगोले, सुखराज बनसोड, आनंद शिरसाठ, शारीक शेख आदी उपस्थित होते.

----------------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande