
रायगड, 25 जुलै (हिं.स.)। : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त कर्जत शहरात यंदा ‘प्रति पंढरपूर’ची आकर्षक उभारणी करण्यात आली असून, या उपक्रमामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला आहे. आमदार महेंद्र थोरवे यांच्या पुढाकारातून साकारलेल्या या उपक्रमामुळे वारकरी, भाविक आणि नागरिकांना प्रत्यक्ष पंढरपूरचा अनुभव घेण्याची संधी मिळत आहे.
‘प्रति पंढरपूर’मध्ये विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची आकर्षक प्रतिकृती, पारंपरिक सजावट, वारकरी दिंडी, टाळ-मृदंगाचा गजर, अभंग-भजन आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विठुरायाचे दर्शन घेतले तसेच भक्तिरसाचा आनंद लुटला.
आमदार महेंद्र थोरवे यांनी धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन करत कर्जतकरांना पंढरपूरचा आध्यात्मिक अनुभव आपल्या शहरातच मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटातील भाविकांनी ‘प्रति पंढरपूर’ला भेट देत विठ्ठल नामाचा गजर केला. संपूर्ण परिसरात आकर्षक रोषणाई, पारंपरिक देखावे आणि भक्तिमय वातावरणामुळे हा उपक्रम कर्जतमधील विशेष आकर्षण ठरला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)