देशभरातील सायबर फसवणुकीचे धागेदोरे वणीत : 11 राज्यांतील नागरिकांना गंडा घालणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल
यवतमाळ, 25 जुलै (हिं.स.) देशभरातील विविध राज्यांतील नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करून मिळवलेली 25 लाख 99 हजार 68 रुपयांची रक्कम वणी येथील एका बँक खात्यात वळती झाल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस तपासात उघडकीस आला आहे. या प्रकरणी वणी पोलिसांनी ''वरलक्ष्मी
देशभरातील सायबर फसवणुकीचे धागेदोरे वणीत:11 राज्यांतील नागरिकांना गंडा घालणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल; धक्कादायक माहिती समोर


यवतमाळ, 25 जुलै (हिं.स.)

देशभरातील विविध राज्यांतील नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करून मिळवलेली 25 लाख 99 हजार 68 रुपयांची रक्कम वणी येथील एका बँक खात्यात वळती झाल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस तपासात उघडकीस आला आहे. या प्रकरणी वणी पोलिसांनी 'वरलक्ष्मी ट्रान्सपोर्ट'च्या नावे खाते चालवणाऱ्या गणेश नंदकिशोर गोहोकर (रा. वणी) आणि पवन साधुजी चाहणकर (रा. नांदेपेरा) या दोन खातेधारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींच्या बँक खात्यात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, हरियाणा, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या तब्बल 11 राज्यांतील फसवणूक झालेल्या नागरिकांचे पैसे जमा झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

भारत सरकारच्या राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टल आणि समन्वय पोर्टलवरील आर्थिक व्यवहारांचे विश्लेषण करत असताना, वणी येथील ॲक्सिस बँकेच्या एका खात्यावर पोलिसांना संशय आला. याप्रकरणी पोलिस शिपाई छाया रामचंद्र उमरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून तपास केला असता, हे खाते सायबर गुन्ह्यांसाठी वापरले जाणारे 'म्युल बँक खाते' असल्याचे उघडकीस आले. 14 ते 17 ऑगस्ट 2025 या अवघ्या चार दिवसांच्या कालावधीत या खात्यात तब्बल 25 लाख 99 हजार रुपये जमा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ही सर्व रक्कम इतर विविध बँक खाती, यूपीआय (UPI) आणि अन्य ऑनलाइन व्यवहारांच्या माध्यमातून तत्काळ पुढे वळवून फसवणूक करण्यात आली.

या संशयास्पद खात्याविरोधात राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टलवर देशभरातून तब्बल 20 तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. या गंभीर प्रकाराची दखल घेत, पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 318(4), 319(2), 3(5) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 च्या कलम 66 (क) आणि 66 (ड) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या या संपूर्ण सायबर फसवणूक प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

----------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande