
दोन लाखांपर्यंत कर्जमाफी, नियमित कर्जदारांनाही लाभ
रायगड, २५ जुलै (हिं.स.) : नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस आणि शेतीमालाला मिळणारा अपुरा भाव यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६' अंतर्गत जिल्ह्यातील ८ हजार ९१४ पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणार असून, कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
शासनाने पात्र कर्ज खात्यांची पडताळणी पूर्ण करून संबंधित माहिती कर्जमाफी पोर्टलवर अपलोड केली आहे. ३० सप्टेंबर २०२५ रोजी पीक कर्ज थकीत असलेले आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत कर्जफेड न करू शकलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या हजारो शेतकरी कुटुंबांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.
या योजनेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही शासनाने प्रोत्साहनपर लाभ जाहीर केला आहे. वेळेत कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे. राष्ट्रीयीकृत, खाजगी, प्रादेशिक ग्रामीण, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांकडून घेतलेल्या पीक कर्जालाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.
लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या याद्या ग्रामपंचायत, सेवा संस्था, बँक शाखा आणि संबंधित कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यानंतर लाभार्थ्यांनी 'आपले सरकार' सेवा केंद्र किंवा संबंधित बँक शाखेत आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे. प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर कर्जमाफीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक तनवीर पाटील यांनी दिली.
राज्य शासनाच्या या निर्णयामुळे रायगड जिल्ह्यातील हजारो शेतकरी कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळणार असून, शेती क्षेत्राला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)