राजूर चौफुली सर्विस रोड तातडीने दुरुस्त करा- खोतकर
छत्रपती संभाजीनगर, 25 जुलै (हिं.स.) : अकोला राष्ट्रीय महामार्गावरील राजूर चौफुली येथील उड्डाण पुलालगतच्या सर्विस रोडची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचाल
अ


छत्रपती संभाजीनगर, 25 जुलै (हिं.स.) : अकोला राष्ट्रीय महामार्गावरील राजूर चौफुली येथील उड्डाण पुलालगतच्या सर्विस रोडची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असून अपघाताची शक्यता वाढल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती.

या गंभीर समस्येची माहिती मिळताच शिवसेना उपनेते तथा जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुनराव खोतकर यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. रस्त्याची झालेली दुरवस्था पाहून त्यांनी संबंधित कार्यकारी अभियंत्यांची खरडपट्टी काढत तातडीने रस्ता दुरुस्तीचे आदेश दिले.

नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणत्याही प्रकारची तडजोड सहन केली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा आमदार खोतकर यांनी अधिकाऱ्यांना दिला. त्यांच्या निर्देशानंतर संबंधित यंत्रणेने तातडीने काम सुरू करत सर्विस रोडवरील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात केली.

विशेष म्हणजे, आमदार अर्जुनराव खोतकर यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेतला. काम दर्जेदार व निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत आमदार खोतकर यांच्या तत्पर हस्तक्षेपाचे स्वागत केले. नागरिकांनी सांगितले की, अनेक दिवसांपासून रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. मात्र, आमदार खोतकर यांनी स्वतः लक्ष घालून प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्यास भाग पाडल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande