
छत्रपती संभाजीनगर, 25 जुलै (हिं.स.) : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज सहकुटुंब प्रति पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी विठुरायाच्या चरणी राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसह समाजाच्या सुख-समृद्धीचे तसेच सर्व भाविकांच्या आरोग्य, आनंद आणि मंगलमय जीवनासाठी प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकऱ्यांच्या अखंड नामघोषाने, टाळ-मृदुंगाच्या गजराने आणि ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषाने परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. वारकरी संप्रदायाची शिस्त, समर्पण, सेवाभाव आणि भक्तीचा अनुभव अविस्मरणीय असल्याची भावना शिरसाट यांनी व्यक्त केली.
यावेळी योगेंद्र सेवाभावी प्रतिष्ठानतर्फे आयोजित फराळ वाटप उपक्रमालाही त्यांनी उपस्थिती लावली. पायी दिंड्यांमधून आलेल्या वारकरी भाविकांचे स्वागत करत त्यांना प्रेमाने फराळाचे वाटप करण्यात आले. विठ्ठलभक्तांची सेवा हीच खरी विठ्ठलभक्ती असल्याची भावना व्यक्त करत समाजसेवा, मानवसेवा आणि भक्तसेवा यांचा सुंदर संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
विठुरायाची कृपा सर्वांवर अखंड राहो आणि प्रत्येकाच्या जीवनात सुख, समाधान, आरोग्य व समृद्धी नांदो, अशी मनःपूर्वक प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी केल्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी यावेळी नमूद केले.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis