
लातूर, 25 जुलै (हिं.स.)।
NEET-UG पेपरफुटी प्रकरणातील आरोपी बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज भगवानराव शिरुरे यांचा जामीन अर्ज दिल्ली न्यायालयाने फेटाळला आहे. विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी शुक्रवारी दिलेल्या आदेशात डॉ. शिरुरे हे पेपरफुटीच्या संघटित टोळीतील सक्रिय कटकारस्थान करणाऱ्यांपैकी एक असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे म्हटले.
न्यायालयाने आरोपींच्या भूमिकेवर कठोर निरीक्षण नोंदवले. पैशांच्या लालसेपोटी आरोपींनी परीक्षा प्रक्रियेच्या विश्वासार्हतेला धक्का पोहोचवल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
लाखो विद्यार्थ्यांच्या विश्वासाला धक्का
NEET-UG सारख्या महत्त्वाच्या प्रवेश परीक्षेतील पेपरफुटीमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचा परीक्षेवरील विश्वास डळमळीत झाला आहे, असे न्यायालयाने म्हटले. अशा प्रकारच्या कृत्यांमुळे केवळ परीक्षा व्यवस्थेलाच नव्हे, तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर परिणाम होतो, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून, पेपरफुटी प्रकरणातील इतर आरोपींचीही चौकशी करण्यात येत आहे.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis