डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत 300 वृक्षांचे वृक्षारोपण
नांदेड, 25 जुलै (हिं.स.)। पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे जतन आणि स्वच्छ, हिरवागार परिसर निर्मितीचा संदेश देत डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णूपुरी, नांदेड येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न
अ


नांदेड, 25 जुलै (हिं.स.)।

पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे जतन आणि स्वच्छ, हिरवागार परिसर निर्मितीचा संदेश देत डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णूपुरी, नांदेड येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात महाविद्यालय व रुग्णालय परिसरात विविध ठिकाणी सागवान, जांभुळ, कडूलिब, पिंपळ, चिंच, आवळा, जांब हिरडा इत्यादी प्रकारच्या 300 वृक्षांची लागवड करण्यात आली. एक झाड लावूया, पर्यावरण वाचवू या हा संदेश देत पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने वृक्षारोपणाबरोबरच वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाचा शुभारंभ अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला. आपल्या मनोगतात त्यांनी वृक्षारोपण ही केवळ एक दिवसाची मोहीम नसून भावी पिढ्यांसाठी निरोगी आणि समृद्ध पर्यावरण निर्माण करण्याची चळवळ असल्याचे सांगितले. महाविद्यालय परिसर अधिक हिरवागार व प्रदूषणमुक्त करण्यासाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.

महाविद्यालय परिसरात वृक्षसंवर्धनाची चळवळ अधिक प्रभावी करण्यासाठी लागवड केलेल्या वृक्षांचे नियमित संगोपन, संरक्षण व देखभाल करण्यात येणार असून, प्रत्येक वृक्षाचे संवर्धन करण्यावर भर देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे महाविद्यालय व रुग्णालय परिसर अधिक स्वच्छ, हिरवागार आणि पर्यावरणपूरक होण्यास मोठी मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

हा उपक्रम पर्यावरण संरक्षणाबाबत समाजात सकारात्मक जनजागृती करणारा ठरला असून, भविष्यातही सामाजिक बांधिलकी जपत अशा लोकहितकारी व पर्यावरणपूरक उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या उपक्रमात डॉ. हेमंत गोडबोले, विशेष कार्य अधिकारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजयकुमार कापसे, उपअधिष्ठाता डॉ. शितल राठोड, प्राध्यापक डॉ.राजेश अंबुलगेकर यांच्यासह अध्यापक निवासी डॉक्टर, पदवीपूर्व व पदव्युत्तर विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. सर्वांनी उत्स्फूर्तपणे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande