सेलूत विठ्ठल नामाच्या जयघोषात निघाली चिमुकल्या वारक-यांची दिंडी; ठिकठिकाणी फराळाचे वाटप
परभणी, 25 जुलै (हिं.स.)। आषाढी एकादशीनिमित्त सेलू शहरात चिमुकल्या वारकर्यांची भक्तिमय दिंडी उत्साहात काढण्यात आली. पारंपरिक वारकरी वेशभूषेत सजलेल्या लहान मुला-मुलींनी टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात दिंडीत सहभागी होत वारकरी परंपरे
सेलूत विठ्ठल नामाच्या जयघोषात निघाली चिमुकल्या वारकर्यांची दिंडी : ठिकठिकाणी फराळाचे वाटप


परभणी, 25 जुलै (हिं.स.)। आषाढी एकादशीनिमित्त सेलू शहरात चिमुकल्या वारकर्यांची भक्तिमय दिंडी उत्साहात काढण्यात आली. पारंपरिक वारकरी वेशभूषेत सजलेल्या लहान मुला-मुलींनी टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात दिंडीत सहभागी होत वारकरी परंपरेचा सुंदर वारसा जपला. या दिंडीमुळे शहरात भक्तिमय वातावरण निर्माण होऊन अलंकापुरीचे स्वरूप अवतरल्याचे चित्र पाहायला मिळाले.

दिंडीतील चिमुकल्या वारकर्यांचे स्वागत करण्यासाठी तसेच फराळ व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी क्रांती चौक येथे विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्या पदाधिकार्यांनी पुढाकार घेतला. यावेळी हेमंतराव आडळकर, रामराव लाडाने, पवन आडळकर, मिलिंद पवार, विनोद तर्टे उपस्थित होते.

शिवसेनेच्या वतीने हरीभाऊ लहाने, संदीप लहाने, बाबा काटकर, रणजित गजमल, हरीभाऊ काळे, बंडू देवधर, डॉ. जोगदंड यांनी तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने मिलिंद सावंत, गणेश काटकर, अशोक शेलार, डॉ. संजय रोडगे, साईराज बोराडे, विनोद बोराडे, मनीष कदम, भाऊसाहेब सोनवणे तसेच पक्षाचे पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित राहून चिमुकल्या वारकर्यांचे स्वागत केले.

गोविंद बाबा मित्र मंडळाच्या वतीने सर्व बाल वारकर्यांसाठी फराळ व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. या सेवाभावी उपक्रमामुळे दिंडीत सहभागी झालेल्या वारकर्यांना दिलासा मिळाला. यावेळी राज्य मंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या उपस्थितीतही वारकर्यांना फराळाचे वाटप करण्यात आले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित या भक्तिमय सोहळ्यामुळे संपूर्ण शहर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेले असून, नागरिकांनी या उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande