पावसाने अचलपूर-परतवाड्यातील मुख्य रस्ते झाले खड्डेमय
अमरावती, 25 जुलै (हिं.स.) अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांची दुरवस्था कायम असून पावसामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालक व पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. अपघाताचा धोका वाढल्याने प्रशासनाने तातडीने पाहणी
पावसाने अचलपूर-परतवाड्यातील मुख्य रस्ते झाले खड्डेमय


अमरावती, 25 जुलै (हिं.स.)

अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांची दुरवस्था कायम असून पावसामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालक व पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. अपघाताचा धोका वाढल्याने प्रशासनाने तातडीने पाहणी करून खड्डे बुजवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

जुळ्या शहरातील अनेक रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाले असले तरी काही जुन्या मार्गांची अवस्था अद्यापही बिकट आहे. पावसामुळे खड्डे पाण्याखाली गेल्याने वाहनचालकांना त्यांचा अंदाज येत नसून दुचाकीस्वारांचा तोल जाऊन किरकोळ अपघात होत असल्याच्या घटना घडत आहेत. अनेक रस्ते अतिक्रमणामुळे आधीच अरुंद झाले आहेत. त्यातच खड्ड्यांमुळे वाहतुकीची समस्या अधिक गंभीर झाली आहे. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात वाहनचालकांची कसरत सुरू असून वाहतूकही संथ होत आहे. खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यातून वाहने गेल्यानंतर पादचाऱ्यांच्या अंगावर चिखलयुक्त पाणी उडत आहे. शाळकरी विद्यार्थी, महिला आणि कार्यालयीन कर्मचारी यांना याचा सर्वाधिक फटका बसत असून अनेकदा वादाचे प्रसंगही उद्भवत आहेत. नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

प्रमुख रस्त्यांची अवस्था बिकट

परतवाड्यातील गुजरी ते बैतूल मार्ग, दुराणी चौक ते गंगा भवन, टिळक चौक ते टीव्ही टॉवर चौक, आठवडी बाजार मार्ग, जयस्तंभ चौक ते विदर्भ मिल्स तसेच अचलपूरमधील देवळी मार्ग, टक्कर चौक ते चावलमंडी, हिरापुरा गेट, अकबरी चौक ते जीवनपुरा गेट आणि दुल्हागेट ते बिसने दवाखाना या मार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून तातडीने दुरुस्तीची आवश्यकता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande