
अमरावती, 25 जुलै (हिं.स.)। राज्यातील बिगर व अंशत: अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २४ जुलै रोजी प्रसिद्ध होणारी प्रारूप मतदार यादी तूर्तास प्रसिद्ध करू नये, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. याबाबतचे आदेश आयोगाच्या सचिवांनी सर्व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहेत. राज्यभर एसआयआरचा कार्यक्रम सुरू असल्याने विधानसभा मतदारसंघांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतरच ग्रामपंचायतींच्या मतदार याद्यांचा कार्यक्रम राबविण्याची सूचना करण्यात आली आहे.
राज्यात सन २०२४, व २०२५ मध्ये मुदत संपलेल्या तसेच २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आयोगाने १५ जुलै रोजी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार २४ जुलै रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे, २९ जुलैपर्यंत हरकती व सूचना स्वीकारणे आणि ४ ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे नियोजित होते. मात्र, भारत निवडणूक आयोगाकडून एसआयआर कार्यक्रम सुरू असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी मतदार यादी कार्यक्रमास मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. विधानसभा मतदारसंघांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतरच ग्रामपंचायतींच्या मतदार याद्यांचा कार्यक्रम राबविण्याची सूचनाही मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केली होती.
याशिवाय, संगणक प्रणालीद्वारे तयार करण्यात आलेल्या अहवालानुसार राज्यातील सुमारे १५ हजार ग्रामपंचायतींपैकी अत्यल्प ग्रामपंचायतींच्याच प्रारूप मतदार याद्या तयार झाल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले. या सर्व बाबींचा विचार करून राज्य निवडणूक आयोगाने २४ जुलै रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध न करण्याचे आदेश दिले असून, सुधारित मतदार यादी कार्यक्रम व पुढील सूचना स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी