
रत्नागिरी, 25 जुलै (हिं.स.) । देवनगरी देवरूख या पर्यटन संकल्पनेला आकार देताना क्रांती व्यापारी संघटनेने सुरू केलेल्या उपक्रमामुळे देवरूखच्या इतिहासाचे अनेक विस्मृतीत गेलेले धागे समोर येऊ लागले आहेत. धार्मिक, सांस्कृतिक, नैसर्गिक आणि ऐतिहासिक वारशाचा अभ्यास करत असताना इतिहास ग्रंथांमध्ये नोंद असलेले १६६६ मधील 'Battle of Devrukh' हे अत्यंत महत्त्वाचे ऐतिहासिक प्रकरण संशोधकांच्या लक्षात आले.
उपलब्ध ऐतिहासिक संदर्भांनुसार, पुरंदरच्या तहानंतर छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यात नजरकैदेत असताना आदिलशाहीचे सरदार पीरमिया आणि ताजखान यांनी देवरूख ताब्यात घेऊन लष्करी तळ उभारला होता. त्यानंतर स्वराज्याच्या वतीने आनंदराव आणि व्यंकोजी दत्तो यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने देवरूखवर धडक मोहीम राबवून आदिलशाही सैन्याचा पराभव केला. या लढाईत पीरमिया आणि ताजखान मारले गेल्याचा तसेच मराठ्यांनी विजय मिळवून एक हत्ती व अनेक घोडे हस्तगत केल्याचा उल्लेख काही इतिहासग्रंथांमध्ये आढळतो. या घटनेमुळे देवरूखचा शिवकालीन इतिहास नव्याने अभ्यासण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर क्रांती व्यापारी संघटना आणि आठल्ये–सप्रे महाविद्यालयाने संयुक्तपणे व्यापक ऐतिहासिक संशोधन मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेचा उद्देश कोणताही पूर्वनिश्चित निष्कर्ष मांडणे हा नसून, पुराव्यांच्या आधारे देवरूखचा खरा इतिहास सर्वांसमोर आणणे हा आहे.
या संशोधन मोहिमेत Battle of Devrukh 1666, महिमतगड, कुंडी घाट, मुरादपूर, प्राचीन देवस्थाने, सरदार घराणी, पिरांच्या समाध्या, वीरगळ, सैनिक व घोड्यांच्या समाध्या, जुने व्यापारी मार्ग, लोकपरंपरा आणि उपलब्ध ऐतिहासिक कागदपत्रांचा सखोल अभ्यास करण्यात येणार आहे. तसेच या लढाईचे संभाव्य रणांगण, त्या काळातील लष्करी हालचाली आणि देवरूखचे सामरिक महत्त्व यांचाही शास्त्रीय पद्धतीने मागोवा घेतला जाणार आहे.
यासाठी इतिहास संशोधक, विविध ऐतिहासिक संशोधन संस्था, मोडी लिपीचे अभ्यासक, पुरातत्त्व तज्ज्ञ, स्थानिक इतिहास जाणणारे ज्येष्ठ नागरिक आणि अभ्यासक यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. क्षेत्रभेटी, ऐतिहासिक स्थळांचे दस्तऐवजीकरण, ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, गॅझेटिअर, बखरी, मोडी कागदपत्रे आणि उपलब्ध संशोधनग्रंथ यांच्या आधारे देवरूखच्या इतिहासाचे सर्व पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
क्रांती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष निखिल कोळवणकर आणि कार्याध्यक्ष नितीन हेगशेट्ये यांच्या पुढाकारातून या उपक्रमाची संकल्पना साकार झाली. या मोहिमेला देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष कृष्णकुमार भोसले, आठल्ये–सप्रे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, समाजशास्त्र विभागाचे श्री. शृंगारे सर आणि डॉ. नारगुडे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे.
या संशोधन मोहिमेमुळे देवरूखचा इतिहास नव्या पिढीसमोर पुराव्यांसह उभा राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. शिवकालीन इतिहासातील देवरूखचे स्थान अधिक स्पष्ट करण्यासाठी ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी