नाशिक : जय हिंद कॉलनीत भटक्या कुत्र्यांचा हैदोस; नागरिकांमध्ये भीती
नाशिक, 25 जुलै, (हिं.स.)। प्रभाग क्रमांक २३ मधील सेक्रेट हार्ड शाळेजवळ, जलसा लॉन्सच्या पाठीमागील जय हिंद कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, महापालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नाशिक : जय हिंद कॉलनीत भटक्या कुत्र्यांचा हैदोस; नागरिकांमध्ये भीती


नाशिक, 25 जुलै, (हिं.स.)। प्रभाग क्रमांक २३ मधील सेक्रेट हार्ड शाळेजवळ, जलसा लॉन्सच्या पाठीमागील जय हिंद कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, महापालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिसरात सध्या १० ते १२ भटके कुत्रे मुक्तपणे फिरत असल्याने लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांत चार ते पाच जणांवर कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या असून, अनेकांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. विशेषतः शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना या कुत्र्यांचा सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे.

स्थानिक रहिवाशांचा आरोप आहे की, महापालिकेने शहरातील इतर भागांतून पकडलेले भटके कुत्रे याच परिसरात आणून सोडल्यामुळे ही समस्या अधिकच तीव्र झाली आहे. या संदर्भात अनेक वेळा तक्रारी करूनही महापालिकेकडून कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नागरिकांनी तातडीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करून परिसर सुरक्षित करण्याची मागणी केली असून, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. वाढत्या घटनांमुळे परिसरातील पालकांमध्येही चिंता वाढली असून, नागरिकांच्या जीवित व सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिकेने त्वरित दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande