विद्यार्थ्यांना सलाम अखेर सरकारला झुकवलेच - डाॅ.जितेंद्र आव्हाड
ठाणे, 25 जुलै (हिं.स.)। - या देशातली लोकशाही, या देशातला भीमराव आंबेडकर प्रत्येकाच्या हृदयात जागा आहे, हे दाखवून दिलं. या तरुण पोरांनी हे पण दाखवून दिलं, हा देश गांधींचा आहे. एवढा मार खाऊन सुद्धा या पोरांनी कुठेही हिंसक प्रतिक्रिया किंवा कायदा स
विद्यार्थ्यांना सलाम अखेर सरकारला झुकवलेच - डाॅ.जितेंद्र आव्हाड


ठाणे, 25 जुलै (हिं.स.)।

- या देशातली लोकशाही, या देशातला भीमराव आंबेडकर प्रत्येकाच्या हृदयात जागा आहे, हे दाखवून दिलं. या तरुण पोरांनी हे पण दाखवून दिलं, हा देश गांधींचा आहे. एवढा मार खाऊन सुद्धा या पोरांनी कुठेही हिंसक प्रतिक्रिया किंवा कायदा सुव्यवस्था बिघडवणारी परिस्थिती निर्माण केली नाही. कुठेही कायदा सुव्यवस्था आपल्या हातात घेतला नाही. म्हणूनच हे सरकार झुकले. या विद्यार्थ्यांना आपण सलाम करतो, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलक विद्यार्थ्यांचे कौतूक केले.

विद्यार्थी आंदोलनानंतर शनिवारी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. त्यानंतर डाॅ.जितेंद्र आव्हाड हे पत्रकारांशी बोलत होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, गटनेते अभिजीत पवार उपस्थित होते.

डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले, वाढती महागाई, वाढती बेरोजगारी, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची झालेली नामुष्की, आपली आजची आर्थिक परिस्थिती तसेच इथेनाॅल या सगळ्यामुळे लोकांमध्ये जो राग होता, तो या आंदोलनातून बाहेर पडला. या आंदोलनामुळे भविष्यातील सर्व आंदोलनांना एक बळ मिळेल आणि आता दबाव कायम राहील. हा दबाव जो निर्माण झालाय, एवढ्या लवकर जाणार नाही. यापुढे इथेनॉल विरुद्ध आंदोलन सुरू होणार आहे.

दहशतीवर राज्यव्यवस्था चालवायची नसते. राज्यव्यवस्था ही नेहमी प्रेमाने चालवायची असते, आपलेपणाने चालवायची असते. सरकारने दहशत निर्माण केली, हे आंदोलन प्रेमाने हाताळलं असतं; पहिल्याच दिवशी या पोरांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला असता, तर परिस्थिती वेगळी असती. पोरांना प्रेमाची गरज होती. तुम्हाला वाटलं ते लाठ्या-काठ्यांना घाबरून जंतरमंतरवर येणार नाहीत. आदल्या दिवशी मार खाल्लेली पोरं दुसऱ्या दिवशी परत जंतरमंतरवर यायची अन् सरकारी पोलीस त्यांना मारायचे. पण, मुले ध्येयापासून दूर झाली नाहीत. देशभरात पेपरफुटी आणि शिक्षण पद्धतीमध्ये भ्रष्टाचार सुरू आहे, ज्यामुळे एक पिढी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्याविरोधात हा आक्रोश होता. मात्र, गेल्या ७० वर्षांत आंदोलने करताना कधीही हिंसा झाली नाही किंवा अमानुषपणे लाठीमार करण्यात आला नाही. पण, युवा वर्गाने मोर्चा जेव्हा काढला ; तेव्हा त्यांच्यावर अमानुष लाठीमार करण्यात आला. हा लढा अहिंसक पद्धतीने सुरू होता, परंतु सरकारने दबावतंत्राचा वापर केला. तरीही, कुठल्याही दबावाला न जुमानता आपले आंदोलन सुरू ठेवले आणि तरुण वर्ग तसेच जनतेने त्यांना साथ दिली, ज्यामुळे शेवटी सरकारला झुकावे लागले.

देशातली लोकशाही, या देशातला भीमराव आंबेडकर प्रत्येकाच्या हृदयात जागा आहे, हे दाखवून दिलं. या तरुण पोरांनी हे पण दाखवून दिलं, हा देश गांधींचा आहे. एवढा मार खाऊन सुद्धा या पोरांनी कुठेही हिंसक प्रतिक्रिया किंवा कायदा सुव्यवस्था बिघडवणारी परिस्थिती निर्माण केली नाही. कुठेही कायदा सुव्यवस्था आपल्या हातात घेतला नाही. पोलीस जे सांगतात ना की आम्ही कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित करायला ते हे करत होतो ते करत होतो. कुठलाही कायदा आणि सुव्यवस्थाचा प्रश्नच निर्माण झाला नव्हता. दादर मधल्या एका प्रसंगामध्ये एका बाईला आणि एका पुरुषाला पकडायला गेल्यानंतर एक बाई मध्ये आली वगैरे वगैरे, तेव्हा आमच्या अजून तुमच्या लक्षात कसं येत आहे? तीच्या शरीराचा भाग कुठल्या आपल्या हातात आलेला आहे? हे पोलिसांना कळणार नाही? आतल्या संवेदना मेल्यात का तुमच्या? आणि प्रवेश करताना तुमच्या डोळ्यात लागलेली आग, तुम्ही काय दरोडेखोराला काय दाऊद इब्राहिमच्या किंवा कुठल्या गँगच्या पोरांना मारायला चालले होते की काय? हे विद्यार्थी चळवळीतली पोरं आहेत. उभ्या असलेल्या पोरीच्या कानशिला खाली वाजवायची. दिल्लीमध्ये काय केलंय? दिल्लीमध्ये काय हाल केलेत पोरांचे? कसे मारलेत त्यांना उभे आडवे? आणि वर्दी नसलेले कोण माणसं पोरांना मारत होती? त्यांच्यावर खटले दाखल केलेच पाहिजेत, असेही डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले.

डाॅ. आव्हाड पुढे म्हणाले, या मुलांवर ज्या केसेस दाखल केल्या आहेत, त्या मागे घेणे हे सरकारचे पहिलं काम असले पाहिजे. कारण ज्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायला हे खटले कारणीभूत ठरतील, उद्या त्यांना पासपोर्टला अडचणी निर्माण होतील, परदेशी जाताना अडचणी निर्माण होतील, प्रत्येक ठिकाणी त्यांच्यासमोर अडचण उभा राहील. कारण ही मुले वाईट कामासाठी आले नव्हते. ते व्यवस्था सुधारण्यासाठी, आपल्यावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी रस्त्यावर आले होते. आता त्यांच्यावर जर केसेस पडल्या असतील, तर सरकार मायबाप आहे. मायबाप सरकारने आपलीच पोरं आहेत, या उद्देशाने गुन्हे मागे घेतले पाहिजेत. आता मोदी म्हणालेच आहेत ना, 'डियर फ्रेंड्स'! तर फ्रेंड्सच्या खांद्यावर हात टाकून त्याला आपलेसे करा आणि त्याचे सगळे गुन्हे माफ करून टाका, अशीही मागणी डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनीकेली.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande