धोक्याच्या वाटेवर पर्यटक; झेनित धबधब्यावर बंदीचा फज्जा
रायगड, 25 जुलै (हिं.स.)। : खोपोली शहराजवळील प्रसिद्ध झेनित धबधब्यावर प्रशासनाने बंदी घातली असतानाही पर्यटकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र समोर आले आहे. मुसळधार पाऊस, वाढलेला पाण्याचा प्रवाह आणि संभाव्य अपघातांचा धोका लक्षात घेऊन प
Tourists on a dangerous path; ban at Zenith Waterfall proves ineffective.


रायगड, 25 जुलै (हिं.स.)। : खोपोली शहराजवळील प्रसिद्ध झेनित धबधब्यावर प्रशासनाने बंदी घातली असतानाही पर्यटकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र समोर आले आहे. मुसळधार पाऊस, वाढलेला पाण्याचा प्रवाह आणि संभाव्य अपघातांचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने धबधब्यावर पर्यटकांना जाण्यास कडक मनाई केली आहे. मात्र, या आदेशाकडे दुर्लक्ष करत अनेक पर्यटक जीव धोक्यात घालून पर्यायी मार्गाने धबधब्याकडे धाव घेत आहेत.

पावसाळ्यात झेनित धबधबा पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरतो. मात्र, सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील दगड निसरडे झाले असून पाण्याचा वेगही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशा परिस्थितीत धबधब्याजवळ जाणे अत्यंत धोकादायक असूनही अनेक तरुण सेल्फी आणि रील्स बनविण्याच्या नादात स्वतःचा जीव धोक्यात घालत असल्याचे दिसून येत आहे.

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने धबधब्याकडे जाणारे मार्ग बंद केले असून बंदीचे फलकही लावले आहेत. तरीही काहीजण पर्यायी वाटांचा वापर करून धबधब्यापर्यंत पोहोचत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

प्रशासनाने नागरिकांना आणि पर्यटकांना बंदी आदेशाचे पालन करण्याचे आवाहन केले असून धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे स्पष्ट केले आहे. पर्यटनाचा आनंद घेताना स्वतःच्या आणि कुटुंबीयांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आवश्यक ती कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande