पावसाळ्यात मेळघाटातील प्रवास कठीण, नदी-नाल्यावरील पूल झाले धोकादायक
अमरावती, 25 जुलै (हिं.स.) विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी सातत्याने धडपड करणारे अनेक नेते मेळघाटच्या रस्त्यांच्या गंभीर स्थितीच्या बाबतीत मौन बाळगून असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे, तर दुसरीकडे शासनाच्या दोन विभागांत टोलवाटोलवी सुरू असल्याने क
मेळघाटात पावसाळ्यात प्रवास कठीण, नदी-नाल्यावरील पूल झाले धोकादायक


अमरावती, 25 जुलै (हिं.स.)

विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी सातत्याने धडपड करणारे अनेक नेते मेळघाटच्या रस्त्यांच्या गंभीर स्थितीच्या बाबतीत मौन बाळगून असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे, तर दुसरीकडे शासनाच्या दोन विभागांत टोलवाटोलवी सुरू असल्याने कोणता रस्ता कुणाचा याचा थांगपत्ता लागत नसल्याची धक्कादायक स्थिती मेळघाटात आहे. मेळघाट व्याघ्रप्रकल्पातून जाणाऱ्या अनेक रस्त्यांची तसेच बसक्या पुलांची अवस्था दिवसेंदिवस खालावत असून खराब रस्त्यांमुळे नागरिक, पर्यटक आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे, उखडलेला डांबरी थर व खडी पसरल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. संबंधित रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी नेमकी सार्वजनिक बांधकाम विभागाची की व्याघ्रप्रकल्प प्रशासनाची, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या संभ्रमाचा फटका मात्र प्रवाशांना बसत असून, एक विभाग दुसऱ्याकडे बोट दाखवत असल्याने रस्त्यांची दुरवस्था कायम आहे, अशी नागरिकांची तक्रार आहे. व्याघ्रप्रकल्पातील रस्त्यांवरून दररोज शासकीय अधिकारी, कर्मचारी, पर्यटक तसेच स्थानिक नागरिकांची वाहतूक सुरू असते. मात्र उखडलेल्या रस्त्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून दुचाकीस्वारांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. नागरिकांनी संबंधित विभागांनी परस्पर समन्वय साधून रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, जबाबदारी निश्चित करून प्रवाशांना सुरक्षित व सुरळीत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.

रस्त्यावर खड्डेच खड्डे मेळघाट व्याघ्रप्रकल्प ३० किलोमीटर रस्त्यावरून जाताना खड्डेच खड्डे आहेत. अशातच वन्यप्राण्यांची भीतीपण आहे. त्यामुळे हा रस्ता तत्काळ दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी अंबापाटी येथील सामाजिक कार्यकर्ते गोकूळ सुरजेकर यांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande