
परभणी, 25 जुलै (हिं.स.)।
आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने कौसडी ग्रामपंचायतीच्या वतीने बशेश्वर नगर येथील केंद्रीय जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सरपंच मोबीन कुरेशी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी बोलताना सरपंच मोबीन कुरेशी यांनी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असून प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन केले. याच निमित्ताने शाळेतील बालगोपालांनी पारंपरिक वेशभूषेत दिंडी काढत आषाढी एकादशी उत्साहात साजरी केली. विठ्ठल-रुक्मिणीच्या नामघोषाने परिसर भक्तिमय झाला. कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक संजय वाघमारे, व्ही. व्ही. पांचाळ, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष बुलबुले, ग्रामपंचायत सदस्य आवेश पटविदार तसेच पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis