
बीड, 25 जुलै (हिं.स.)। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर नेकनूर येथील श्री गुरु बंकटस्वामी व्यापारी संघटनेच्या वतीने सेवाभावी उपक्रम राबवत श्री गुरु बंकटस्वामी मठात तसेच श्री क्षेत्र चाकरवाडीकडे जाणाऱ्या वारकरी दिंड्यांसाठी फराळाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला वारकरी बांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आषाढी वारीनिमित्त विविध भागांतून येणाऱ्या वारकरी दिंड्या श्री गुरु बंकटस्वामी मठात दर्शनासाठी तसेच श्री क्षेत्र चाकरवाडीच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना व्यापारी संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी त्यांचे स्वागत करून फराळाचे वाटप केले. यावेळी वारकऱ्यांना साबुदाणा खिचडी, केळी, पिण्याचे पाणी, चहा व अन्य फराळाचे पदार्थ देण्यात आले.
वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. दिवसभर शेकडो वारकरी या फराळाचा लाभ घेत होते. सेवाभावी वृत्ती जपत वारकऱ्यांना प्रेमाने सेवा देणाऱ्या व्यापारी संघटनेच्या कार्याचे वारकरी बांधवांनी कौतुक केले.
या उपक्रमात श्री गुरु बंकटस्वामी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य तसेच स्थानिक व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. वारकरी संप्रदायाची सेवा ही समाजाप्रती आपली बांधिलकी असल्याची भावना यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
वारकऱ्यांच्या सेवेमुळे श्री गुरु बंकटस्वामी मठ परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला असून या सेवाभावी उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis