
परभणी, 25 जुलै (हिं.स.)। परभणी महानगरपालिकेच्या मुख्य राइजिंग मेन पाइपलाईनच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी काम अत्यंत जटिल व तांत्रिक स्वरूपाचे असल्याने अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागत आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा आणखी दोन ते तीन दिवस बंद राहणार असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे.
मुख्य राइजिंग मेन पाइपलाईन फुटल्यामुळे विद्यानगर, अमेय नगर, खंडोबा नगर आणि पार्वती नगर येथील पाण्याच्या टाक्यांवरून होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. सुरुवातीला दुरुस्तीस चार ते पाच दिवस लागण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, कामादरम्यान निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे दुरुस्तीला विलंब होत असून पाणीपुरवठा पूर्ववत होण्यासाठी आणखी दोन ते तीन दिवस लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या तांत्रिक पथकांकडून जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, काम पूर्ण होताच शहरातील पाणीपुरवठा तातडीने पूर्ववत करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने आणि जपून वापर करावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis