
बीड, 25 जुलै (हिं.स.)।
चोपणवाडी येथील रहिवासी प्रल्हाद डिसले यांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. त्यांच्या निधनामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रल्हाद डिसले यांनी लहानपणीच वडिलांचे छत्र गमावले होते. आजोबा व चुलत्यांच्या आधारावर त्यांचे संगोपन झाले. कष्टाळू आणि मेहनती स्वभावामुळे त्यांनी शेतीची जबाबदारी समर्थपणे सांभाळली होती. त्यामुळे ते कुटुंबाचा प्रमुख आधार बनले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, दिवसभर त्यांनी शेततळ्यातील पाणी वापरून कापूस पिकावर फवारणीचे काम केले. काम पूर्ण झाल्यानंतर शेततळ्याजवळ हात-पाय धुत असताना त्यांचा पाय घसरला. ते थेट पाण्यात पडले आणि बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेने चोपणवाडी परिसरात शोककळा पसरली असून, त्यांच्या पश्चात कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावकऱ्यांनी प्रल्हाद डिसले यांच्या निधनाबद्दल तीव्र हळहळ व्यक्त करत कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis