
सोलापूर, 25 जुलै (हिं.स.)। आषाढी वारीच्या इतिहासात यंदा आरोग्य सेवेसाठी पहिल्यांदाच उपलब्ध करण्यात आलेल्या 'एअर ॲम्ब्युलन्स' (हवाई रुग्णवाहिका) सेवेचा प्रत्यक्ष वापर करण्यात आला आहे. वारीदरम्यान प्रकृती गंभीर झालेल्या एका भाविक वारकऱ्याला या एअर ॲम्ब्युलन्सद्वारे तातडीने पुढील उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले.
रस्त्यावरील गर्दीवर हवाई मार्गाने मात
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर नगरीत लाखो वारकरी दाखल झाले आहेत. अशा अभूतपूर्व गर्दीत रस्त्यावरून नेहमीच्या रुग्णवाहिकेने रुग्णाला वेळेत रुग्णालयात पोहोचवणे अत्यंत आव्हानात्मक ठरते. हीच गंभीर बाब विचारात घेऊन जिल्हा प्रशासनाने यंदाच्या वारीत अत्याधुनिक एअर ॲम्ब्युलन्स तैनात केली होती. प्रशासनाचा तात्काळ निर्णय
वारीदरम्यान संबंधित वारकऱ्याची प्रकृती अचानक खालावल्यानंतर उपस्थित वैद्यकीय पथकाने कोणताही विलंब न करता रुग्णाला हवाई मार्गाने सोलापूरला हलवण्याचा निर्णय घेतला. प्रशासनाने तात्काळ सूत्रे हलवून एअर ॲम्ब्युलन्सच्या साहाय्याने रुग्णाला अवघ्या काही मिनिटांत सोलापूर येथील रुग्णालयात पोहोचवले. वेळेवर मिळालेल्या या अत्यंत महत्त्वाच्या वैद्यकीय उपचारांमुळे रुग्णाचा जीव वाचवण्यास मदत झाली असून, प्रशासनाच्या या तत्परतेचे सर्व भाविकांकडून कौतुक होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड