
रत्नागिरी, 25 जुलै (हिं.स.) । आषाढी एकादशीच्या निमित्ताने देवरूखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास विजय रहाटे यांनी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी विठ्ठलभक्ती अनोख्या पद्धतीने जपण्याचा उत्तम प्रयत्न केला.
विठ्ठलभक्तीची आस्था व निष्ठेपायी त्यांनी आषाढ महिन्यात सावळ्या विठ्ठल रूपाच्या अनेक मनमोहक रांगोळ्या साकारल्या आहेत.
आषाढी एकादशीच्या भक्तीने बहरलेल्या वातावरणात श्री. रहाटे यांनी नदीकाठच्या मऊ मातीपासून छोटीशी वीट तयार करून, ती भाजून पक्की केली. नंतर त्या विटेवर केवळ एका तासाभरात साक्षात श्री पांडुरंगाची प्रतिमा रांगोळीने कलात्मक पद्धतीने साकारली आहे. ही विटेवरील रांगोळी पाहून सारेच जण स्तिमित होता.
यापूर्वीच्या आषाढी एकादशीला श्री. रहाटे यांनी तुळशीच्या पानावर विठ्ठल, मोरपिसावर विठ्ठल, पाण्याखाली विठ्ठलाची रांगोळी साकारून कलाप्रेमींची मने जिंकली होती. तीच परंपरा श्री. रहाटे यांनी यावर्षीही सुरू ठेवली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी