
सोलापूर, 25 जुलै (हिं.स.)।
जिल्ह्यात खरीप हंगाम २०२६ मधील पेरणीच्या कामांनी चांगलाच वेग घेतला असून जुलैअखेरपर्यंत सरासरी ४८.५ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. महा कृषी ॲप पोर्टलवरील अद्ययावत अहवालानुसार, यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल मका, तूर, उडीद आणि सोयाबीन या पिकांच्या लागवडीकडे सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी काही दिवसांत सातत्याने पाऊस झाल्यास उर्वरित क्षेत्रावरील पेरणीची कामेही अत्यंत वेगाने पूर्ण होतील, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
पिकनिहाय आकडेवारीचा विचार करता, तृणधान्य व कडधान्य पिकांमध्ये मक्याच्या पेरणीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यातील ४७ हजार ८६१ हेक्टर मका क्षेत्रापैकी तब्बल ३० हजार २६८ हेक्टर म्हणजेच ६३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कडधान्यांमध्ये तुरीची ८६ हजार ५८३ हेक्टरपैकी २८ हजार ९४० हेक्टर (३३ टक्के) आणि उडदाची ५८ हजार १६६ हेक्टरपैकी २२ हजार ६८४ हेक्टर (३९ टक्के) क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. याशिवाय मुगाची १५ टक्के, बाजरीची १९ टक्के तर ज्वारीची २७ टक्के पेरणी पार पडली आहे.
तेलबिया आणि रोख पिकांमध्ये (नगदी पिके) सोयाबीन आणि कापसाला शेतकऱ्यांनी सर्वाधिक पसंती दर्शवली आहे. सोयाबीनची विक्रमी ८८ टक्के पेरणी झाली असून एकूण ८१ हजार २७० हेक्टरपैकी ७१ हजार ४८१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. कापसाची पेरणी तब्बल ९३ टक्के क्षेत्रावर पूर्ण झाली असून, सूर्यफुलाची मात्र १० टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड