
पुणे, 25 जुलै, (हिं.स.)। जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत (SIR) मतदारयादी अचूक आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्यात महायुतीने बाजी मारली आहे. मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींच्या (BLA) नियुक्तीमध्ये महायुतीने तब्बल १७ हजार प्रतिनिधींची नियुक्ती केली असून, त्या तुलनेत महाविकास आघाडीने केवळ ७ हजार ८८४ प्रतिनिधी नेमले आहेत. निवडणूक शाखेच्या आकडेवारीवरून काही राजकीय पक्षांची या प्रक्रियेतील उदासीनता स्पष्ट झाली आहे.
एकूण २४ हजार ८८४ मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची (बीएलए) नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये महायुतीकडून एकूण १७ हजार प्रतिनिधी दिले आहेत. याअंतर्गत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक ७ हजार ८०६, राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) ५ हजार ६६७, तर शिवसेनेने (शिंदे गट) ३ हजार ५२७ जणांची नियुक्ती केली आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीने एकूण ७ हजार ८८४ प्रतिनिधी नेमले आहेत, ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) २ हजार ९५७, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) २ हजार ४४५ आणि काँग्रेसने २ हजार १७३ जणांची नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) केवळ ३२९ प्रतिनिधी दिले आहेत.
मतदारयादी अद्ययावत करण्याच्या या मोहिमेअंतर्गत येत्या ८ ऑगस्टपर्यंत केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घरोघरी जाऊन मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी करणार आहेत. या अंतर्गत जिल्ह्यातील एकूण ९० लाख ८० हजार १७३ मतदारांच्या नोंदी तपासल्या जाणार आहेत. जिल्ह्यामधील ८ हजार ४१७ मतदान केंद्रांवर ही विशेष मोहीम राबवली जात आहे. मतदारयादीत सर्व मतदारांची नोंद व्हावी आणि याद्या अचूक असाव्यात, यासाठी निवडणूक विभागाने सर्व राजकीय पक्षांना आपले बीएलए नेमण्याचे आवाहन केले होते. प्रशासनाच्या या आवाहनाला महायुतीने सर्वाधिक प्रतिसाद दिल्याचे चित्र आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु