
पुणे, 25 जुलै (हिं.स.)। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत नव्याने लागू केलेले 'बेटरमेंट' (सुधारणा प्रक्रिया) शुल्क तत्काळ रद्द करण्याची मागणी असोसिएशन ऑफ सेल्फ फायनान्स इन्स्टिट्यूट्सने (एएसएफआय) केली आहे. अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या धर्तीवर राबवावी, अशी आग्रही भूमिका या संघटनेने घेतली आहे. सीईटी सेलच्या या नव्या शुल्कामुळे महाविद्यालयांमधील रिक्त जागा भरल्या जाण्याची शक्यता फारच कमी असून, उलट प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांवर याचा विनाकारण मोठा आर्थिक भार पडणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
सीईटी सेलने नुकत्याच घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयानुसार, यंदाच्या अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांसाठी 'बेटरमेंट' प्रक्रियेकरिता स्वतंत्र शुल्क लागू करण्यात आले आहे. या नव्या नियमानुसार, विद्यार्थ्यांना जागा स्वीकृतीसाठी एक हजार रुपये आणि त्यापुढील 'बेटरमेंट'साठी दोन ते तीन हजार रुपये असे अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. प्रवेश प्रक्रियेतील या नव्या बदलाला आणि वाढीव शुल्काला आता आक्षेप घेतला जात आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी एएसएफआयचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी सीईटी सेलला एक सविस्तर निवेदन दिले असून, त्यामध्ये वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेप्रमाणेच कोणतीही गुंतागुंत न ठेवता अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया राबवण्याची आणि हे अतिरिक्त बेटरमेंट शुल्क तातडीने रद्द करण्याची लेखी मागणी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु