
सोलापूर, 25 जुलै (हिं.स.)।आ षाढी एकादशीच्या मुख्य पर्वकाळाच्या दिवशी शासकीय महापूजेच्या वेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन दरवर्षी बंद ठेवले जाते. मात्र, यंदा प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत या कालावधीतही मुखदर्शन सुरू ठेवले, ज्यामुळे हजारो भाविकांना विठूरायाचे सुलभ दर्शन घेता आले. यंदाच्या आषाढी यात्रेनिमित्त देशभरातून तब्बल ३० लाखांहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले असून, टाळ-मृदंगाचा गजर आणि विठुरायाच्या जयघोषाने संपूर्ण पंढरी नगरी दुमदुमून गेली आहे.
वाढत्या गर्दीमुळे सध्या विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून तब्बल २० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर म्हणजेच गोपाळपूरच्या पुढे स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत पोहोचली आहे. भाविकांना दर्शनासाठी किमान २४ ते २५ तासांचा अवधी लागत असून, दर्शनरांगेत एकाच वेळी ८० हजारांपेक्षा जास्त भाविक उभे आहेत. दुसरीकडे, मुखदर्शनाची रांगही तीन किलोमीटरपर्यंत गेली आहे. चंद्रभागेच्या तीरावर स्नानासाठी आणि प्रदक्षिणा मार्गावर नगरप्रदक्षिणेसाठी दिंड्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. संत नामदेव पायरी, पश्चिम द्वार आणि महाद्वार परिसर वारकऱ्यांनी फुलून गेला आहे. कालपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे दर्शनरांगेत उभ्या असलेल्या वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आषाढी एकादशीचे औचित्य साधून श्री विठ्ठल मंदिराचा गाभारा, सोळखांबी, चौखांबी, सभामंडप आणि संत नामदेव पायरी परिसर आकर्षक फुलांनी सजवण्यात आला आहे. यंदा प्रथमच कमळाच्या फुलांसह २५ ते ३० विविध प्रकारच्या देशी-विदेशी फुलांचा वापर करण्यात आला आहे. पुण्यातील भाविक भारत भुजबळ यांच्या वतीने जवळपास ५ टन फुलांचा वापर करून ही नयनरम्य सजावट करण्यात आली असून, यामुळे मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड