
पुणे, 25 जुलै (हिं.स.)।
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पिंपरी-चिंचवड शहर यांच्यातील ३४ वर्षांचे घट्ट नाते संपल्यानंतर, आता राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार) शहरातील सूत्रे जय पवार यांच्याकडे जाताना दिसत आहेत. अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी शहरातील राजकारणात सक्रिय रस घेण्यास सुरुवात केली असून त्यांचे पिंपरी-चिंचवडमधील दौरे लक्षणीयरीत्या वाढले आहेत. शहरात संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला असून स्थानिक पातळीवरील घडामोडींवर ते थेट लक्ष ठेवून आहेत.
जय पवार यांनी नुकतीच शहरातील पक्षाचे माजी नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सर्व उपस्थितांशी संवाद साधत पालिका प्रशासनात काम करताना येणाऱ्या अडचणी आणि स्थानिक समस्या जाणून घेतल्या. यापुढे कोणतीही अडचण किंवा काम असल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा, असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. तसेच २८ तारखेनंतर पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघांची स्वतंत्र आढावा बैठक घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या तीन दशकांपासून पिंपरी-चिंचवडमधील सर्व राजकीय व प्रशासकीय निर्णय अजित पवार यांच्याच नेतृत्वाखाली घेतले जात होते. पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे आणि थेट संबंध होते. त्यांच्या निधनानंतर शहरात पक्षाच्या नेतृत्वाबद्दल काहीशी अस्वस्थता आणि अनिश्चितता निर्माण झाली होती. मात्र, आता जय पवार यांनी पुढाकार घेत प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्याने शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसची संपूर्ण धुरा त्यांच्याकडे सोपवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु