
सोलापूर, 25 जुलै (हिं.स.)।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आम्हाला महाराष्ट्रातच राहायचे असून मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, असे ठाम वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केले आहे. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपुरातील पर्यावरण दिंडीच्या समारोप प्रसंगी पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध राजकीय व सामाजिक मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले. आम्ही मुंबई, नागपूर किंवा कुठेही असलो तरी विठुरायाची पूजा आणि सेवा सातत्याने करतच राहू, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थी आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत अमृता फडणवीस यांनी तो प्रसंग 'काळा क्षण' असल्याचे म्हटले. प्रत्येक नागरिक आणि कलाकाराला आपले विचार मांडण्याचा लोकशाहीत अधिकार आहे; मात्र काही समाजकंटकांनी पोलिसांवर आणि विद्यार्थ्यांवर केलेला हल्ला अत्यंत निंदनीय आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटना रोखण्यासाठी सरकार लवकरच कडक कायदा आणत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड