
पुणे, 25 जुलै, (हिं.स.)। राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने'अंतर्गत जिल्ह्यातील ६१ हजार ९०० शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांचे प्रत्येकी दोन लाख रुपये याप्रमाणे तब्बल ५२३ कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली. कर्जमाफीच्या याद्या अद्ययावत झाल्यानंतर लाभार्थ्यांची संख्या आणि योजनेची व्याप्ती आणखी वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) वतीने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानावर आधारित एका नव्या कर्ज योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. गणेश कला क्रीडा रंगमंच येथे झालेल्या कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ‘अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजने’चे उद्घाटन पार पडले. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळवण्याची प्रक्रिया अधिक जलद आणि सुलभ होणार आहे.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आणि माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, पीडीसीसी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शितोळे यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु