
- एअर ॲम्बुलन्ससह आरोग्य विभागाची प्रभावी व्यवस्था
सोलापूर, 26 जुलै (हिं.स.)।
आषाढी वारी २०२६ दरम्यान राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ या संकल्पनेतून तब्बल ७ लाख २३ हजार ८२ वारकरी भाविकांना मोफत आरोग्य सेवा पुरविली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
यंदाच्या वारीत प्रथमच एअर ॲम्बुलन्स आणि ‘आरोग्यसंपन्न वारी’ या डिजिटल ॲपचा वापर करून आरोग्य सेवा अधिक जलद व तंत्रज्ञानाधारित करण्यात आल्या. पालखी मार्गापासून पंढरपूरपर्यंत व्यापक आरोग्य यंत्रणा उभारण्यात आली.
यासाठी ३५३ रुग्णवाहिका, ४३ सुसज्ज आयसीयू, १५६ ‘आपला दवाखाना’, २१५ आरोग्यदूत, ३,०८७ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आणि ३०२ तज्ज्ञ डॉक्टर तैनात करण्यात आले. पंढरपूरमध्ये २४ तास कार्यरत आयसीयू, महाआरोग्य शिबिरे, मोफत चष्मा वाटप, डिजिटल मॅपिंग, पाणी स्रोतांचे निर्जंतुकीकरण, डेंग्यू-मलेरिया प्रतिबंधात्मक उपाययोजना, स्वच्छता अभियान आणि आरोग्य जनजागृती यांसह विविध सेवा पुरविण्यात आल्या.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, आतापर्यंत ७ लाख १८ हजार ६३५ बाह्यरुग्णांवर उपचार, ४ हजार ४४७ रुग्णांना आंतररुग्ण सेवा तर १ हजार ५३३ रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले आहे. या प्रभावी आरोग्य व्यवस्थेमुळे लाखो वारकऱ्यांना वेळेत उपचार मिळून वारी अधिक सुरक्षित आणि आरोग्यसंपन्न झाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड