वर्ध्यात आढळला अतिदुर्मिळ ‘अल्बिनो बुलबुल’
वर्धा 27 जुलै (हिं.स.) । निसर्गाची कियमाच न्यारी. रंगसंगती, आकार, अवयव रचना, पंख व अन्य बाबी ज्या फक्त वन्यजीवांनाच लाभल्या आहेत. त्यामुळे निसर्ग निरीक्षण सदैव चालणारी व नव्या जगाची ओळख देणारी प्रक्रिया असते, असे अभ्यासक सांगतात. म्हणून अति दुर्मिळ
३० हजार पक्ष्यांमध्ये असा एकच! वर्ध्यात आढळला अतिदुर्मिळ ‘अल्बिनो बुलबुल’


वर्धा 27 जुलै (हिं.स.) । निसर्गाची कियमाच न्यारी. रंगसंगती, आकार, अवयव रचना, पंख व अन्य बाबी ज्या फक्त वन्यजीवांनाच लाभल्या आहेत. त्यामुळे निसर्ग निरीक्षण सदैव चालणारी व नव्या जगाची ओळख देणारी प्रक्रिया असते, असे अभ्यासक सांगतात. म्हणून अति दुर्मिळ हा शब्द वन्यजीवांबाबत अनेकदा वापरल्या जातो. अनेक पक्षी व प्राणी प्रजाती लुप्त होत चालल्याचे सांगण्यात येते. म्हणून त्याचा सांभाळ व निरीक्षण चालत असते. त्यातील ही एक घटना.

हिंदी विद्यापीठात बसेरा

जिल्ह्यातील प्रादेशिक वनक्षेत्रात प्रथमच अतिदुर्मिळ अल्बिनो बुलबुल पक्षी आढळून आला आहे. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या मानववंशशास्त्र विभागातील एसोशिएट प्रोफेसर आणि वन्यजीवप्रेमी डॉ. वीरेन्द्र प्रताप यादव हे नेहमीप्रमाणे आपल्या निसर्गप्रेमी सहकाऱ्यांसह डॉ. पीयूष पतंजली आणि समीर अवस्थी यांच्यासोबत रविवारी वर्ध्याच्या प्रादेशिक वनक्षेत्रात भ्रमंती करत होते. त्यावेळी त्यांना रस्त्यावर काही पक्षी बसलेले दिसले. वाहन जवळ येताच ते पक्षी उडून रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपांवर जाऊन बसले. त्या पक्ष्यांमध्ये एक पक्षी असामान्यरित्या पांढऱ्या रंगाचा असल्याचे डॉ. यादव यांच्या लक्षात आले.

आपला संशय दूर करण्यासाठी ते त्या पक्ष्याजवळ गेले. पक्ष्याच्या शेपटीखालील लालसर डाग (अंडर-टेल कव्हर्ट्स/व्हेंट) पाहून त्यांनी तो अतिदुर्मिळ अल्बिनो बुलबुल असल्याचे ओळखले. या शोधाची खात्री करण्यासाठी त्यांनी मोबाईलने काढलेले छायाचित्र तात्काळ वर्धा जिल्ह्यातील वनसंशोधन केंद्राचे वनरक्षक आणि पक्षीतज्ज्ञ मनेशकुमार लिंगुराम सज्जन यांना पाठवले.डॉ. यादव यांनी सांगितले की, साधारणपणे तीस हजार पक्ष्यांमागे एखादा पक्षी अल्बिनो असण्याची शक्यता असते.बुलबुल प्रजातीमध्ये ही घटना अधिकच दुर्मिळ मानली जाते. पक्ष्यांमध्ये आनुवंशिक उत्परिवर्तनामुळे त्यांच्या शरीरातील नैसर्गिक रंगद्रव्य ‘मेलॅनिन’ तयार होणे बंद होते आणि त्यामुळे त्यांचा रंग पूर्णतः पांढरा होतो. ही अत्यंत दुर्मिळ जन्मजात अवस्था असून ती पालकांकडून मिळालेल्या जनुकांमुळे उद्भवते. अशा पक्ष्यांचे पंख पूर्णतः पांढरे (पूर्ण अल्बिनो) किंवा अंशतः पांढरे (आंशिक अल्बिनो) असतात, तर डोळे, चोच आणि पाय गुलाबी किंवा लालसर रंगाचे असतात. वर्ध्यात प्रथमच अतिदुर्मिळ अल्बिनो बुलबुलची नोंद डॉ. वीरेन्द्र प्रताप यादव यांनी केली आहे. डॉ. यादव म्हणतात की असा पक्षी दिसणे हे भाग्यच. आम्हास तो दिसला आणि कॅमेरात टिपता आला हे अतीव आनंद देणारे क्षण आमच्या आयुष्यात ठरतील.

-------------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande