
विष्णू मनोहर करणार ३,५०० क्विंटल चिवड्याचा विश्वविक्रम
यवतमाळ, 27 जुलै (हिं.स.)। वऱ्हाडातील खाद्यसंस्कृतीची एक आगळीवेगळी ओळख आणि यवतमाळकरांचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या प्रसिद्ध ‘बुढीच्या चिवड्या’ला आता जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी यवतमाळकर सरसावले आहेत. यवतमाळची ही पारंपरिक चव जगाच्या नकाशावर पोहोचवण्यासाठी प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ, ज्येष्ठ कलावंत व उद्योजक विष्णू मनोहर आणि कोल्हापूरच्या प्राजक्ता पै शहापूरकर यांनी एका विश्वविक्रमाचा संकल्प सोडला आहे.
येत्या २७ ऑक्टोबर रोजी यवतमाळ येथील दाते कॉलेजच्या पटांगणावर एस. एल. फाउंडेशनच्या माध्यमातून तब्बल ३,५०० क्विंटल (३ लाख ५० हजार किलो) ‘बुढीचा चिवडा’ प्रत्यक्ष बनवून त्याचे मोफत वाटप केले जाणार आहे. या उपक्रमाद्वारे ‘सेवा वितरणाचा’ नवा जागतिक विक्रम रचला जाणार असल्याची माहिती येथे आयोजित पत्रकार परिषदेत शेफ विष्णू मनोहर यांनी दिली. यावेळी एस.एल. फाऊंडेशनचे अध्यक्ष अश्विन सव्वालाखे आदी उपस्थित होते.
तुमच्या शहरात काय प्रसिद्ध आहे, असा प्रश्न कोणत्याही यवतमाळकराला केला की, बुढीचा चिवडा हे उत्तर कानावर पडते. कुरकुरीत पोह्याचा आणि त्यावर मोट टाकून निंबू पिळून हाता घेतलेली चिवड्याची पुडी सध्या २० रुपयांत मिळते. ९० वर्षापूर्वी १९३६ मध्ये ही चावड्याची पुडी केवळ एक आण्याला (सहा पैसे) मिळायची. अंजनाबाई रामचंद्र भुजाडे यांनी १९३६ मध्ये आझाद मैदानावर चिवडा विकण्यास सुरूवात केली. पाहता पाहता हा चिवडा एवढा लोकप्रिय झाला की, त्याला यवतमाळकर बुढीचा चिवडा म्हणू लागले. त्यांच्यानंतर श्रावण रामचंद्र भुजाडे यांनी या चिवड्याला आणखी लोकप्रिय केले. तिसऱ्या पिढीत हा चिवडा अशोक श्रावण भुजाडे यांच्या हाती आला. त्यांनी आपल्या आजीच्या चिवड्याला यवतमाळच्या घराघरात पोहचविले. आता त्यांच्या चौथ्या पिढीचा अजय अशोक भुजाडे हा परंपरागत व्यवसाय सांभाळतात. आजही अंजनाबाईच्या हातच्या चवीसारखा चिवडा मिळतो, असे पणतू अजय भुजाडे सांगतात.
पोहे, डाळ आणि मसाल्यांचे अचूक प्रमाण आणि पारंपरिक पद्धतीने तळलेला हा चिवडा त्याच्या खास चवीसाठी आणि खुसखुशीतपणासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओळखला जातो. या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर शेफ विष्णू मनोहर यांनी स्वतः अजय भुजाडे यांची भेट घेऊन या चिवड्याची चव घेत मूळ रेसिपी, साहित्य व तंत्र समजून घेतले आहे. या विश्वविक्रमाच्या वेळी अजय भुजाडे हे स्वतः विष्णू मनोहर यांच्यासोबत उपस्थित राहणार आहेत. शेफ विष्णू मनोहर यांनी जळगावच्या प्रसिद्ध ‘वांग्याच्या भरतापासून’ विश्वविक्रमांची मालिका सुरू केली होती. आतापर्यंत त्यांनी ३३ विक्रम केले असून, अमेरिकेतील पॅनपॅक येथील ३४ व्या विक्रमानंतर यवतमाळचा ‘बुढीचा चिवडा’ हा त्यांचा ३५ वा जागतिक विक्रम ठरणार आहे. या विश्वविक्रमाच्या तयारीवर ते स्वतः लक्ष ठेवून आहेत. दाते कॉलेजमधील एस.एल. फाऊंडेशन या माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या संकल्पनेतून या विश्वविक्रमाची कल्पना पुढे आली.
महाविक्रमाचे प्रमुख आकर्षण आणि वैशिष्ट्ये
हा प्रचंड प्रमाणात चिवडा बनवण्यासाठी खास १५ बाय १५ फूट आकारमानाची आणि साडेसहा फूट खोल असलेली सुमारे १० हजार लिटर क्षमतेची कढई वापरली जाईल. या कढईचे वजनच तब्बल तीन टन इतके राहणार आहे. दाते कॉलेजच्या प्रांगणात २७ ऑक्टोबरच्या मध्यरात्री ३ वाजतापासून चिवडा बनवण्याच्या मुख्य प्रक्रियेला सुरुवात होईल. सकाळी ६ वाजेपर्यंत चिवडा तयार होईल आणि त्यानंतर यवतमाळकर तसेच बाहेरून येणाऱ्या नागरिकांना हा चिवडा मोफत वितरित केला जाईल.
----------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी