
शेतकऱ्यांनी पीकअप वाहन अडवून दिले पोलिसांच्या ताब्यात
अमरावती, 26 जुलै (हिं.स.)
तालुक्यात शेतकऱ्यांसाठी अनुदानित युरिया खताचा काळाबाजार होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. कुऱ्हा येथील एका कृषी सेवा केंद्रातून सुमारे ७० युरिया खताच्या बॅगा मध्य प्रदेशात नेल्या जात असल्याचा संशय व्यक्त करीत शेतकऱ्यांनी पीकअप वाहन अडवून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र कृषी विभाग आणि पोलिसांनी पडताळणीनंतर वाहन सोडल्याने याप्रकरणाबाबत संशय अधिकच गडद झाला असून सखोल चौकशीची मागणी होत आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, २४ जुलै रोजी रात्री सुमारे १० वाजता एमपी २८ जी २४११ क्रमांकाच्या पीकअप वाहनातून कुऱ्हा येथील एका कृषी सेवा केंद्रातून युरिया खताच्या सुमारे ७० बॅगा तिवसा मार्गे मध्य प्रदेशात नेल्या जात होत्या. याची माहिती मिळताच काही शेतकऱ्यांनी कुऱ्हा-तिवसा मार्गावर वाहन अडवून तिवसा पोलिसांच्या स्वाधीन केले. शेतकऱ्यांना युरिया खताचा तुटवडा असल्याचे सांगितले जात असताना, त्याच खताची परराज्यात छुप्या मार्गाने वाहतूक केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. औद्योगिक वापरासाठी तसेच परराज्यात अधिक दराने विक्री होत असल्याने अनुदानित युरियाची वळवणूक केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. युरिया खताच्या अवैध वाहतुकीमुळे स्थानिक शेतकऱ्यांना पुरेसा पुरवठा होत नसल्याची तक्रार असून, संबंधित कृषी सेवा केंद्रातील साठा, खरेदी-विक्रीची नोंद आणि वाहतुकीची कागदपत्रे यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कुऱ्हा येथील ज्या कृषी सेवा केंद्रातून युरिया भरला गेला, त्या केंद्रातील साठा, त्याची नोंद आणि कालावधी, याची संपूर्ण चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल. वाहतूक परवाना व बिलाची पडताळणी करून त्याबाबतचा अहवाल पोलिसांना देण्यात आला आहे. -डी. बी. ठाकरे, नियंत्रक, तिवसा.
---------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी