
लातूर, 26 जुलै (हिं.स.)जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने आज जिल्हा क्रीडा संकुल येथील शहीद स्मारक येथे 'कारगील विजय दिवस' साजरा करण्यात आला. कारगील युद्धात प्राणांची आहुती दिलेल्या लातूर जिल्ह्यातील अमर शहीदांच्या स्मृतीस उजाळा देत त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून करण्यात आली. वीर पत्नी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, ५३ महाराष्ट्र एनसीसी बटालियनचे अधिकारी आणि माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून कारगील युद्धातील शूरवीरांना सामूहिक आदरांजली वाहण्यात आली. या प्रसंगी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल शरद पांढरे (नि.), कॅप्टन कृष्णा गिरी, कॅप्टन विलास सूर्यवंशी, माजी सैनिक सय्यद शब्बीर तसेच माजी सैनिक संघटनेचे इतर प्रमुख अधिकारी व लातूर जिल्ह्यातील वीर पत्नी उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाला जिल्ह्यातील माजी सैनिक, ५३ महाराष्ट्र एनसीसी बटालियनचे कॅडेट्स, लष्करी मुलांचे व मुलींचे वसतिगृहातील विद्यार्थी आणि लातूर शहरातील नागरिक उपस्थित होते. देशभक्तीपर वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात उपस्थितांनी शूर सैनिकांच्या त्यागाचे आणि बलिदानाचे स्मरण केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis