
छत्रपती संभाजीनगर, 26 जुलै (हिं.स.)संजय शिरसाट यांनी अभिजीत दिपके यांच्या घरी जाऊन त्यांच्या आई-वडिलांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात देशभरात तीव्र जनआक्रोश आणि 'जेन झी' (Gen Z) विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आक्रमक आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. शिक्षणमंत्र्यांच्या या राजीनाम्यानंतर कॉकरोच जनता पार्टीसह देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.
एकीकडे या यशाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क येथे भव्य 'तिरंगा रॅली' पार पडत असतानाच, दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये एक महत्त्वाची राजकीय आणि कौटुंबिक भेट पाहायला मिळाली. शिवसेना (शिंदे गट) नेते तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेल्या अभिजीत दिपके यांच्या घरी जाऊन त्यांच्या आई-वडिलांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आता संजय शिरसाट यांनी या भेटीमागचं नेमकं कारण सांगितलं आहे.
दिपके कुटुंबाशी आमचे नातेसंबंध आहेत. आंदोलनादरम्यान प्रकरणाला राजकीय वळण लागू नये म्हणून घरी आलो नव्हतो. आता अभिजीतच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो असून सरकार त्याची योग्य ती काळजी घेईल, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिलीय.
मंत्री शिरसाठ यांनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे मनातील प्रश्न मिटला. आंदोलनादरम्यान राजकारण होऊ नये म्हणून आंदोलनाच्या काळात ते आले नव्हते. आंदोलनाला यश मिळाल्याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया अभिजीत दिपके यांचे वडील भगवान दिपके यांनी दिली आहे.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis