
पुणे, 26 जुलै (हिं.स.)ससून सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णावर तातडीने सीपीआर सुरू असताना मोबाईलवर चित्रीकरण करण्यास मनाई केल्याच्या कारणावरून एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी रुग्णाच्या नातेवाईकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.याबाबत प्रशिक्षणार्थी डॉक्टरने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, घोरपडी गावातील ३० वर्षीय आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सुमारे १०.४५ वाजता एका रुग्णाला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी तातडीने सीपीआरसह उपचार सुरू केले. त्याचवेळी रुग्णाच्या नातेवाईकाने मोबाईलवरून उपचारांचे चित्रीकरण करण्यास सुरुवात केली.वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी चित्रीकरणास मनाई करताच आरोपीने संतापून वैद्यकीय कक्षात गोंधळ घातला. त्याने प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना शिवीगाळ करत मारहाण केली. घटनेनंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून आरोपीला रोखले आणि पोलिसांना माहिती दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु