
अमरावती, 27 जुलै (हिं.स.) जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा उजाडला तरी पश्चिम विदर्भातील (अमरावती विभाग) धरणांमधील पाणीसाठ्याची स्थिती फारशी दिलासादायक नाही. जलसंपदा विभागाच्या ताज्या अहवालानुसार, विभागातील मोठे, मध्यम आणि लघु अशा एकूण २८८ प्रकल्पांमध्ये सध्या ३८.०५ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. अमरावती जिल्ह्याची जीवन वाहिनी मानल्या जाणाऱ्या ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात ५१.६३ टक्के साठा झाला आहे.
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या आकडेवारीनुसार, विभागातील ९ मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या ५८०.४३ दशलक्ष घनमीटर (दलघमी) म्हणजेच ४१.४६ टक्के साठा आहे. गतवर्षी याच दिनांकाला मोठ्या प्रकल्पांमध्ये ४२.५५ टक्के साठा नोंदवला गेला होता. मात्र गेल्या ५ वर्षांच्या सरासरीचा (७४४.८७ दलघमी) विचार करता यंदा जलसाठ्याची गती काहीशी मंद असल्याचे स्पष्ट होते. अमरावती जिल्ह्यातील ऊर्ध्व वर्धा धरणामध्ये २९१.२३ दलघमी (५१.६३ टक्के) पाणी साठले असून, १ जूनपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३४२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील पूस (३४.९३ टक्के), अरुणावती (४१.६४ टक्के) आणि बेंबळा (४०.१७ टक्के) या प्रकल्पांमध्ये ४० टक्क्यांच्या आसपास साठा जमा झाला आहे. यवतमाळमधील सायखेडा मध्यम प्रकल्प सर्वाधिक ९७.५३ टक्के भरला आहे. अकोल्याचा काटेपूर्णा प्रकल्प अवघ्या १७.३२ टक्क्यांवर अडकला असून, वान प्रकल्पात ४२.६१ टक्के साठा आहे. बुलढाण्यातील नळगंगा (५६.६९ टक्के) आणि पेनटाकळी (३९.३७टक्के) हे प्रकल्प वगळता खडकपूर्णा प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा अजूनही शून्य टक्के आहे.
विभागातील २७ मध्यम प्रकल्पांमध्ये ४३.६५ टक्के साठा उपलब्ध असला तरी २५२ लघु प्रकल्पांमध्ये अवघा २८.२७ टक्के जलसाठा आहे. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचा प्रश्न या लघु प्रकल्पांवर अवलंबून असतो. पावसाने दडी मारल्यास आगामी काळात ग्रामीण भागात पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे. ऑगस्ट महिन्यात दमदार पाऊस झाला नाही, तर विभागातील अनेक तालुक्यांमध्ये पाण्याचे काटेकोर नियोजन करावे लागण्याची चिन्हे आहेत.
----------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी