लातूर : आष्टा मोड टोल नाका ठरतोय प्रवाशांसाठी डोकेदुखी
स्वच्छतागृहात वीज आणि पाण्याची सोय नाही लातूर, 27 जुलै (हिं.स.) : अहमदपूर-लातूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर असलेल्या आष्टा मोड टोल नाक्यावर प्रशासनाचा मोठा ढिसाळ कारभार समोर आला आहे. या ठिकाणच्या टोल नाक्यावरील स्वच्छतागृहात रात्रीच्या वेळी
टोल नाका परिसरात गैरसोय


स्वच्छतागृहात वीज आणि पाण्याची सोय नाही

लातूर, 27 जुलै (हिं.स.) : अहमदपूर-लातूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर असलेल्या आष्टा मोड टोल नाक्यावर प्रशासनाचा मोठा ढिसाळ कारभार समोर आला आहे. या ठिकाणच्या टोल नाक्यावरील स्वच्छतागृहात रात्रीच्या वेळी लाईट आणि पाण्याची कोणतीही सोय नसल्याने येथून प्रवास करणाऱ्याढ प्रवाशांना, विशेषतः महिलांना आणि लहान मुलांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांकडून सक्तीने टोल वसूल केला जात असतानाही, त्या बदल्यात प्रवाशांना साध्या मूलभूत सुविधाही मिळत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

लातूर आणि अहमदपूर दरम्यानच्या या महत्त्वाच्या मार्गावरून दिवस-रात्र शेकडो छोटी-मोठी वाहने धावतात. रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी टोल नाक्यांवर स्वच्छतागृहे असणे बंधनकारक आहे. मात्र, आष्टा मोड येथील टोल नाक्यावरील स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रात्रीच्या वेळी या ठिकाणी अंधार पसरलेला असतो आणि पाण्याचा मागमूसही नसतो. परिणामी, विशेषतः महिला प्रवाशांना अत्यंत मानहानीकारक आणि गैरसोयीच्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित टोल प्रशासनाच्या या बेजबाबदार व मुजोरी कारभारामुळे प्रवाशांच्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली होत आहे.

एका बाजूला हायवे प्रशासनाकडून आधुनिक सुविधांचे दावे केले जातात, तर दुसऱ्या बाजूला प्रत्यक्षात प्रवाशांना मूलभूत सुविधांसाठीही वणवण भटकण्याची वेळ येत आहे. या गंभीर समस्येकडे आता तरी हायवे प्रशासनाने आणि टोल चालकांनी गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ आष्टा मोड टोल नाक्यावरील स्वच्छतागृहात वीज आणि २४ तास पाण्याची अखंडित सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी संतप्त प्रवाशांमधून होत आहे. जर प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना केली नाही, तर तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही संतप्त नागरिकांकडून दिला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande