
अंनिसच्या पाठपुराव्याला यश; उत्पादन प्रक्रियेत गंभीर त्रुटी
सिन्नर, 27 जुलै (हिं.स.) : सिन्नर तालुक्यातील जायगाव येथील डॉ. मोहन पुरी यांच्या शिवनाथ आयुर्वेद प्रॉडक्ट कंपनी या औषधनिर्मिती संस्थेचा परवाना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कायमचा रद्द केला आहे. भोंदूगिरी व बेकायदेशीर औषधनिर्मितीविरोधात महाराष्ट्र अंनिसने केलेल्या पाठपुराव्याला हे यश मिळाल्याचे अंनिसने म्हटले आहे.
अंनिसच्या राज्य सचिव ॲड. रंजना पगार-गवांदे यांनी डॉ. मोहन पुरी हे नियमबाह्य पद्धतीने औषधनिर्मिती करत असल्याची तक्रार अन्न व औषध प्रशासनाकडे केली होती. त्यानंतर प्रशासनाने जायगाव येथील कारखान्यावर छापा टाकून तपासणी केली. या तपासणीत औषधनिर्मितीचे निकष न पाळणे, उत्पादन प्रक्रियेत गंभीर त्रुटी आणि कायद्यातील विविध नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले.
सुनावणीनंतर प्रशासनाने डॉ. पुरी यांच्या औषधनिर्मितीचा परवाना कायमचा रद्द करण्याचा आदेश दिला. याबाबतची अधिकृत माहिती नाशिक परिमंडळ-२ चे सहाय्यक आयुक्त (औषधे) तथा अनुज्ञप्ती अधिकारी चं. अ. मोरे यांनी पत्राद्वारे ॲड. रंजना पगार-गवांदे यांना कळविली आहे. अंनिसच्या माहितीनुसार, डॉ. मोहन पुरी हे भोंदू राजेंद्र गडगेबाबा प्रकरणातील सहआरोपी असून, विविध भोंदूबाबांना औषधांचा पुरवठा करत असल्याचा संशयही तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV