घोटी–सिन्नर फाटा उड्डाणपुलावर ट्रक दुभाजकाला धडकून उलटला
Truck overturns after hitting divider on Ghoti-Sinner Phata flyover
Truck overturns after hitting


इगतपुरी, 27 जुलै (हिं.स.) : नाशिक–मुंबई महामार्गावरील घोटी–सिन्नर फाटा उड्डाणपुलावर आज विटांनी भरलेला ट्रक दुभाजकाला धडकून उलटल्याची घटना घडली. या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले असून ट्रकमधील विटा महामार्गावर विखुरल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, विटांची वाहतूक करणारा ट्रक नाशिकच्या दिशेने जात असताना घोटी–सिन्नर फाटा उड्डाणपुलावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक थेट रस्त्याच्या दुभाजकाला धडकला आणि महामार्गावर उलटला. अपघाताचा मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक आणि इतर वाहनचालक मदतीसाठी घटनास्थळी धावले.

महामार्गावर विटा विखुरल्याने वाहतूक विस्कळीत

ट्रक उलटल्यानंतर त्यामधील विटा महामार्गावर विखुरल्याने काही काळ वाहतुकीचा वेग मंदावला. घटनेची माहिती मिळताच घोटी महामार्ग पोलीस केंद्र, घोटी पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

एकेरी मार्गाने वाहतूक सुरू

पोलीसांनी घटनास्थळी सुरक्षा व्यवस्था करून महामार्गावर विखुरलेल्या विटा हटविण्याचे काम हाती घेतले. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी काही काळ वाहनांची वाहतूक एकेरी मार्गाने सुरू ठेवण्यात आली. अपघातग्रस्त ट्रक बाजूला करण्याचे आणि महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande