
छत्रपती संभाजीनगर, 27 जुलै (हिं.स.)।धाराशिवच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. अवघ्या महिनाभरापूर्वी शिवसेना (ठाकरे) पक्षाला रामराम ठोकून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या कृतीमुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पक्षांतरानंतर ओमराजे निंबाळकर यांच्यावर ठाकरे गटाकडून जोरदार टीका करण्यात आली होती. स्वतः उद्धव ठाकरे यांनी धाराशिव येथील सभेत ओमराजे निंबाळकर यांचा नावानिशी समाचार घेत कडव्या शब्दांत टीका केली होती. त्यामुळे दोन्ही नेत्यांमधील राजकीय दुरावा अधिक स्पष्ट झाला होता.
मात्र, या सर्व घडामोडींनंतरही ओमराजे निंबाळकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या शुभेच्छांमुळे राजकीय चर्चांना नव्याने सुरुवात झाली आहे.
ही केवळ राजकीय सभ्यता आहे की भविष्यातील काही राजकीय संकेत आहेत, याबाबत आता तर्कवितर्कांना वेग आला आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या या अनपेक्षित पोस्टमुळे धाराशिवसह राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, या संदेशामागील नेमका अर्थ काय, याची चर्चा रंगली आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis