'जर तर ची गोष्ट’चा रंगणार ४०० वा प्रयोग तर ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी’चा ५० वा प्रयोग
मुंबई, 12 ऑगस्ट, (हिं.स.)। मराठी रंगभूमीवर ‘गोष्ट तशी गंमतीची’, ‘परफेक्ट मिसमॅच’, ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’, ‘दादा एक गुड न्यूज आहे’ अशी दर्जेदार आणि आशयपूर्ण नाटकांची परंपरा जपणाऱ्या सोनल प्रॉडक्शन्सच्या दोन नाटकांनी सध्या नाट्यरसिकांच्या मनावर अधिराज
जर तर ची गोष्ट’चा रंगणार ४०० वा प्रयोग तर ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’चा रंगणार ५० वा प्रयोग


मुंबई, 12 ऑगस्ट, (हिं.स.)। मराठी रंगभूमीवर ‘गोष्ट तशी गंमतीची’, ‘परफेक्ट मिसमॅच’, ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’, ‘दादा एक गुड न्यूज आहे’ अशी दर्जेदार आणि आशयपूर्ण नाटकांची परंपरा जपणाऱ्या सोनल प्रॉडक्शन्सच्या दोन नाटकांनी सध्या नाट्यरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. ‘जर तर ची गोष्ट’ आणि ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ या दोन्ही नाटकांना महाराष्ट्रासह देश-परदेशातील रसिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असून दोन्ही नाटकांची यशस्वी घोडदौड कायम आहे. विशेष म्हणजे, ‘जर तर ची गोष्ट’चा ४०० वा प्रयोग १६ ॲागस्ट रोजी प्रभादेवी येथील रविंद्र नाट्य मंदिर येथे सकाळी ११ वाजता, तर ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’चा ५० वा प्रयोग ३० ॲागस्ट रोजी विलेपार्ले येथील दिनानाथ नाट्यगृह येथे ४ वाजता रंगणार आहे. त्यामुळे सोनल प्रॉडक्शन्सच्या शिरपेचात आणखी दोन मानाचे तुरे रोवले जाणार आहेत.

प्रिया बापट प्रस्तुत आणि नंदू कदम निर्मित ‘जर तर ची गोष्ट’ या नाटकाने आपल्या आगळ्या विषयामुळे आणि कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. अद्वैत दादरकर आणि रणजित पाटील दिग्दर्शित, इरावती कर्णिक लिखित या नाटकाचे आतापर्यंतचे प्रयोग हाऊसफुल्ल ठरले असून, मुंबई-पुण्यासह महाराष्ट्राच्या विविध भागांत तसेच महाराष्ट्राबाहेर आणि परदेशातही या नाटकाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आता या नाटकाच्या ४०० व्या प्रयोगाची उत्सुकता नाट्यरसिकांमध्ये निर्माण झाली आहे.

तर दुसरीकडे, प्रिया बापट प्रस्तुत आणि नंदू कदम निर्मित ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ या नाटकानेही रंगभूमीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. एका कुटुंबातील तीन वेगवेगळ्या पिढ्यांच्या जगण्यातील, विचारांतील आणि नात्यांतील गंमतीदार प्रवास उलगडणाऱ्या या नाटकाला महाराष्ट्रासह महाराष्ट्राबाहेरही रसिकांकडूनही भरभरून दाद मिळत आहे. ३० ऑगस्ट रोजी या नाटकाचा ५० वा प्रयोग रंगणार असून हा टप्पा देखील विशेष ठरणार आहे. सोनल प्रॉडक्शन्स निर्मित या नाटकात सुनील बर्वे, हर्षदा खानविलकर, अक्षर कोठारी, शर्मिला राजाराम शिंदे, शंतनू ठवळी आणि वैष्णवी आंबवणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. लेखन अमोल पाटील यांचे असून दिग्दर्शन अद्वैत दादरकर यांचे आहे.

विशेष म्हणजे, दोन्ही नाटकांच्या यशामागे त्यांचा नात्यांशी असलेला भावनिक धागा हा महत्त्वाचा घटक आहे. ‘जर तर ची गोष्ट’मधून तरुणाईच्या नात्यांमधील गुंतागुंत, प्रेम, अपेक्षा आणि बदलत्या भावविश्वाचा वेध घेतला आहे, तर ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’मध्ये तीन पिढ्यांमधील नात्यांवर, विचारांवर आणि बदलत्या जीवनशैलीवर हलक्याफुलक्या शैलीत भाष्य करण्यात आले आहे. दोन्ही नाटकं हसवत-खेळवत नात्यांचं महत्त्व अधोरेखित करतात.

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी, आपलीच माणसं, आपल्या नात्यांमधील छोटे-मोठे गैरसमज, प्रेम, अपेक्षा आणि भावभावना यांचं प्रतिबिंब या दोन्ही नाटकांमध्ये दिसत असल्याने ती रसिकांना मनापासून ‘आपली’ वाटतात. म्हणूनच केवळ मनोरंजन न करता प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणाऱ्या या दोन्ही कलाकृतींना सातत्याने प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे. नाटक संपल्यानंतरही त्यातील व्यक्तिरेखा, प्रसंग आणि नात्यांमधील भावना प्रेक्षकांच्या मनात रेंगाळत राहातात, हीच या दोन्ही नाटकांच्या यशाची खरी पावती म्हणावी लागेल.

या दोन्ही नाटकांना मिळणाऱ्या उदंड प्रतिसादाबद्दल निर्माते नंदू कदम म्हणतात, “नाटक करणं ही आमच्यासाठी केवळ एक व्यावसायिक गोष्ट नाही तर रसिकांशी जोडला जाणारा एक भावनिक प्रवास आहे. ‘जर तर ची गोष्ट’ आणि ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ या दोन्ही नाटकांना प्रेक्षकांनी ज्या पद्धतीने स्वीकारलं, ते आमच्यासाठी खूप मोठं समाधान आहे. दोन्ही नाटकांचे विषय वेगळे असले तरी त्यांचा केंद्रबिंदू नातेसंबंध हा आहे आणि म्हणूनच कदाचित प्रत्येक प्रेक्षकाला त्यात स्वतःचं किंवा आपल्या आसपासच्या माणसांचं काहीतरी दिसतं. ‘जर तर ची गोष्ट’चा ४०० वा प्रयोग आणि ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’चा ५० वा प्रयोग हा आमच्यासाठी नक्कीच आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेर आणि परदेशातही या नाटकांना मिळणारा प्रतिसाद पाहून मन भरून येतं. हे सगळं शक्य झालं आहे ते आमच्या नाट्यरसिकांच्या प्रेमामुळे. त्यांनी प्रत्येक प्रयोगाला दिलेली दाद, नाटकानंतर व्यक्त केलेल्या भावना, सोशल मीडियावरून आलेले संदेश आणि पुन्हा पुन्हा नाटक पाहाण्याची व्यक्त केलेली इच्छा, हे आमच्यासाठी खूप मोठं बळ आहे. प्रेक्षकांचं हे प्रेमच आम्हाला आणखी चांगल्या, दर्जेदार आणि मनाला भिडणाऱ्या कलाकृती त्यांच्यासमोर घेऊन येण्याची प्रेरणा देतं. रसिकांनी आमच्यावर असंच प्रेम कायम ठेवावं, हीच मनापासून इच्छा आहे.”

एकाच निर्मिती संस्थेची दोन नाटकं, दोन वेगळ्या पिढ्यांच्या नात्यांचा वेध आणि दोन्ही कलाकृतींना मिळणारं प्रेक्षकांचं सारखंच भरभरून प्रेम, ही सोनल प्रॉडक्शन्सच्या या यशाची खासियत ठरली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande