
मुंबई, 12 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीत आजवर वेगवेगळे विषय हे हाताळले गेले आहेत. आता असाच काहीसा वेगळा विषय आपल्याला आगामी धडपड या सिनेमातून भेटीस येणार आहे. ग्रामीण जीवन, शेतकरी कुटुंबाची संघर्षमय वाटचाल, स्वप्ने आणि त्यासाठीची त्यांची धडपड यांचे प्रभावी चित्रण या सिनेमातून पाहायला मिळणार आहे. नुकतेच या सिनेमाच्या चित्रीकरणाला आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी येथे सुरुवात झाली आहे. स्त्रीप्रधान विषय असलेल्या या सिनेमात अभिनेत्री स्मिता तांबे हिची मध्यवर्ती भूमिका आपल्याला पहायला मिळणार आहे.
बोधी सिनेमा प्रस्तुत आणि अश्विनी समाधान ऐवळे निर्मित या सिनेमाची कथा बालाजी वाघमोडे यांच्या कथेवर आधारित आहे. चित्रपटाच्या निर्मितीसाठी अनुभवी तंत्रज्ञांची टीम कार्यरत असून फुला या काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सिनेमाचे दिग्दर्शक अभिषेक जावीर हेच या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. क्रिएटिव्ह डायरेक्टर अनुप जगदाळे, कॅमेरामन वीरधवल पाटील, कला दिग्दर्शक अतुल लोखंडे, वेशभूषा दिपाली देशमुख, नेपथ्य स्वाती थोरात आणि कार्यकारी निर्माता कल्पेश जगताप, संगीत दिग्दर्शक समाधान ऐवळे हे या चित्रपटासाठी काम पाहणार आहेत. अभिनेत्री स्मिता तांबे, अभिनेते किशोर चौगुले, कुशल बद्रिके, पार्थ भालेराव, मोनालिसा बागल, अश्विनी कासार, प्रभाकर मोरे आणि रोहित चव्हाण हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत.
अल्पभूधारक शेतकरी कुटुंबाभोवती या सिनेमाचे कथानक फिरते. कर्त्या पुरुषाच्या कर्मदरिद्रीपणामुळे स्वप्नांची होणारी राख, त्यातून कुटुंबावर येणारी संकटे आणि या परिस्थितीतही संसाराचा गाडा पुढे नेण्यासाठी धडपडणारी स्त्री यांचे भावनिक आणि वास्तववादी चित्रण या कथेत करण्यात आले आहे.
कुटुंब आणि आपल्या रानासाठी अहोरात्र धडपडणाऱ्या स्त्रीची संघर्षगाथा या चित्रपटातून मांडण्यात येणार आहे. त्याचबरोबर गावातील राजकारण, महिला नेतृत्व, राजकीय कुरघोड्या आणि त्यातून सामान्य माणसाची होणारी पिळवणूक यावरही भाष्य करण्यात आले आहे.
ग्रामीण मातीत रुजलेली कथा, शेतकरी कुटुंबाचा संघर्ष, नात्यांची गुंतागुंत, राजकारणाचे वास्तव आणि स्वप्नांसाठीची जिद्द यामुळे ‘धडपड’ हा सिनेमा प्रेक्षकांसाठी वेगळी पर्वणी ठरणार असल्याचे दिग्दर्शक अभिषेक जावीर यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर