
शेअर बाजारात गुरुवारी संमिश्र वातावरण
मुंबई, 13 ऑगस्ट (हिं.स.) : भारतीय शेअर बाजारात १३ ऑगस्ट रोजी संमिश्र वातावरण पाहायला मिळाले. सेन्सेक्समध्ये किरकोळ वाढ झाली, तर निफ्टी सलग तिसऱ्या सत्रात घसरला. बाजार बंद होताना सेन्सेक्स ११३.६१ अंकांनी अर्थात ०.१५ टक्क्यांनी वाढून ७८,०७९.९६ अंकांवर पोहोचला. दुसरीकडे, निफ्टी ४०.१० अंकांनी अर्थात ०.१६ टक्क्यांनी घसरून २४,३९५.८५ अंकांवर बंद झाला.बाजारातील एकूण कल जवळपास समतोल राहिला. बीएसईवर एकूण ४,५४५ समभागांमध्ये वाढ झाली, तर २,१९८ समभाग घसरले. २२७ समभागांच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही.
निफ्टीतील प्रमुख समभागांमध्ये टाटा कंझ्युमर, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स, एचयूएल, एनटीपीसी आणि श्रीराम फायनान्स हे सर्वाधिक वाढणाऱ्या समभागांमध्ये राहिले. तर हिंडाल्को इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, अल्ट्राटेक सिमेंट, ग्रासिम आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन यांच्या समभागांमध्ये सर्वाधिक घसरण नोंदवण्यात आली.टाटा समूहाच्या समभागांमध्ये आज काही प्रमाणात रिकव्हरी पाहायला मिळाली. टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स आणि टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स हे निफ्टीतील सर्वाधिक वाढणाऱ्या समभागांमध्ये होते.
क्षेत्रनिहाय मिश्र कामगिरी
क्षेत्रनिहाय बाजाराची कामगिरी संमिश्र राहिली. निफ्टी मेटल निर्देशांकात सुमारे १ टक्के, तर प्रायव्हेट बँक निर्देशांकात ०.५ टक्क्यांची घसरण झाली. याउलट रिअल्टी क्षेत्रात १ टक्के, तर कंझ्युमर ड्युरेबल्स निर्देशांकात ०.४५ टक्क्यांची वाढ झाली.ब्रॉडर मार्केटमध्ये तुलनेने चांगली कामगिरी दिसून आली. निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप हे दोन्ही निर्देशांक किरकोळ वाढीसह बंद झाले.
ऍस्ट्रल आणि सोना बीएलडब्ल्यूमध्ये ८ टक्क्यांची तेजी
अपेक्षेपेक्षा चांगले पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर झाल्यानंतर ऍस्ट्रल आणि सोना बीएलडब्ल्यू प्रिसिजन फोर्जिंग्स यांच्या समभागांमध्ये जोरदार तेजी दिसून आली. दोन्ही कंपन्यांच्या समभागांनी सुमारे ८ टक्क्यांची वाढ नोंदवली.एकूणच, जागतिक आणि देशांतर्गत बाजारातील मिश्र संकेतांमुळे भारतीय बाजारात आज संमिश्र वातावरण राहिले. सेन्सेक्सने किरकोळ वाढ नोंदवली असली तरी निफ्टीतील सलग तिसऱ्या सत्रातील घसरण कायम राहिली.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी