
मुंबई, 15 ऑगस्ट (हिं.स.)। स्मार्टफोन निर्माता कंपनी मोटोरोलाने भारतीय बाजारात आपला नवीन मोटो जी मॅक्स स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनच्या लाँचमुळे कंपनीच्या जी-सीरिज लाइनअपमध्ये आणखी एका नव्या मॉडेलची भर पडली आहे. गेल्या महिन्यात मोटोरोला एज ७० मॅक्स लाँच केल्यानंतर भारतात दाखल होणारा हा कंपनीचा दुसरा ‘मॅक्स’ स्मार्टफोन आहे. मोठी बॅटरी, १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटचा डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन चिपसेट ही या फोनची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
मोटो जी मॅक्सची भारतातील किंमत ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या एकमेव प्रकारासाठी २७,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन पॅन्टोन अलास्कन ब्ल्यू, पॅन्टोन मलागा आणि पॅन्टोन स्टारगेझर या रंगांमध्ये उपलब्ध आहे. फोनची विक्री फ्लिपकार्टवरून केली जाणार असून, २० ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता विक्री सुरू होईल. लाँच ऑफरअंतर्गत अॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास १,००० रुपयांची तात्काळ सवलत मिळणार आहे. याशिवाय ग्राहकांना १,००० रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनसही मिळू शकतो.
मोटो जी मॅक्समध्ये ६.७२ इंचांचा फुल एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्क्रीनचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्झ असून, पीक ब्राइटनेस १,०५० निट्सपर्यंत आहे. स्क्रीनला कॉर्निंग गोरिला ग्लास ७आयचे संरक्षण देण्यात आले आहे. फोनमध्ये ४ नॅनोमीटर तंत्रज्ञानावर आधारित क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६एस जनरेशन ४ प्रोसेसर देण्यात आला आहे. त्यासोबत ६ जीबी एलपीडीडीआर५एक्स रॅम आणि १२८ जीबी यूएफएस ३.१ स्टोरेज मिळते. रॅम बूस्ट फीचरच्या मदतीने व्हर्च्युअल रॅम २४ जीबीपर्यंत वाढवता येते.
कॅमेरा विभागात मागील बाजूस ५० मेगापिक्सेलचा सोनी लायटिया ६०० मुख्य कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. हा फोन अँड्रॉइड १६ आधारित हेलो यूआयवर चालतो. कंपनीने दोन अँड्रॉइड ओएस अपग्रेड आणि तीन वर्षांचे सुरक्षा अपडेट देण्याचे आश्वासन दिले आहे.
फोनमध्ये तब्बल ७,००० एमएएच क्षमतेची बॅटरी असून, ३० वॅट टर्बोपॉवर चार्जिंगचा सपोर्ट मिळतो. कंपनीच्या दाव्यानुसार, एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर फोन ६३ तासांपर्यंत बॅटरी बॅकअप देऊ शकतो. फोनचे वजन २१३ ग्रॅम असून, त्याची जाडी ८.६० मिलीमीटर आहे. त्यामुळे मोठी बॅटरी आणि दमदार हार्डवेअर असलेला हा फोन मध्यम श्रेणीतील ग्राहकांसाठी लक्षवेधी पर्याय ठरू शकतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule