
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट (हिं.स.)। केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन फ्यूल (एटीएफ)च्या निर्यातीवर आकारण्यात येणाऱ्या अप्रत्याशित नफा करात (विंडफॉल टॅक्स) कपात केली आहे. नवीन दर 14 ऑगस्टपासून लागू झाले आहेत.
वित्त मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, पेट्रोलच्या निर्यातीवरील कर पूर्णपणे रद्द म्हणजेच ‘शून्य’ करण्यात आला आहे, तर डिझेल आणि जेट फ्यूलवरील शुल्कातही दिलासा देण्यात आला आहे. अधिसूचनेनुसार, डिझेलच्या निर्यातीवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्काचा दर आता 25.5 रुपये प्रति लिटरवरून कमी करून 24 रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे. त्याचवेळी, विमान इंधनाच्या निर्यातीवरील एसएईडी कमी करून आता पूर्वीच्या 22 रुपये प्रति लिटरऐवजी 19.5 रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे. तसेच पेट्रोलच्या निर्यातीवरील शुल्क कमी करून शून्य करण्यात आले आहे. यापूर्वी ते 3.5 रुपये प्रति लिटर होते.
वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, शुल्कातील बदल 14 ऑगस्टपासून लागू होतील. मंत्रालयाने सांगितले की, देशांतर्गत वापरासाठी पेट्रोल आणि डिझेलवरील सध्याच्या शुल्काच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पश्चिम आशियात सुरू असलेल्या सध्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधनाची देशांतर्गत उपलब्धता वाढवण्यासाठी अप्रत्याशित नफा कर लागू करण्यात आला होता. उल्लेखनीय आहे की, पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारने 27 मार्च रोजी डिझेल आणि एटीएफवर निर्यात शुल्क लागू केले होते. पेट्रोलच्या निर्यातीवरही 16 मेपासून हा शुल्क लागू करण्यात आला होता. सरकारकडून दर पंधरवड्याला याचा आढावा घेतला जातो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule