
मुंबई, 14 ऑगस्ट (हिं.स.)। सोशल मीडियाच्या जगातील सर्वाधिक लोकप्रिय अॅप्सपैकी एक असलेल्या इन्स्टाग्रामने तब्बल दहा वर्षांनंतर आपल्या लुकमध्ये महत्त्वाचा बदल केला आहे. इन्स्टाग्रामने गुरुवारी आपला नवा वर्डमार्क म्हणजेच केवळ मजकुराच्या स्वरूपातील लोगो सादर केला. अॅपच्या वरच्या बाजूला ‘इन्स्टाग्राम’ हे नाव ज्या पद्धतीने दिसते, त्यालाच वर्डमार्क म्हटले जाते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, गेल्या दहा वर्षांपासून या वर्डमार्कमध्ये कोणताही बदल करण्यात आला नव्हता. त्यामुळे आता त्याला नव्या स्वरूपात सादर करण्याची योग्य वेळ आली होती.
इन्स्टाग्रामचे प्रमुख अॅडम मोसेरी यांनी स्वतः या बदलाची माहिती दिली. त्यांनी इन्स्टाग्राम आणि थ्रेड्स या दोन्ही माध्यमांवर यासंदर्भात पोस्ट केली. त्यांनी नव्या वर्डमार्कचे वर्णन अधिक धारदार आणि आधुनिक असे केले आहे. मात्र, नव्या डिझाइनमध्ये जुन्या वर्डमार्कची साधेपणा आणि कलात्मकता कायम ठेवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अॅपच्या शीर्षस्थानी असलेल्या वर्डमार्कमध्ये गेल्या दहा वर्षांत कोणताही बदल झाला नव्हता, त्यामुळे त्यात सुधारणा करण्याची ही योग्य वेळ असल्याचे मोसेरी यांनी सांगितले.
इन्स्टाग्रामचा जुना कर्सिव्ह म्हणजेच हस्ताक्षरासारखा वर्डमार्क डिझायनर मॅकी सॅटरडे यांनी २०१३ मध्ये तयार केला होता. नव्या वर्डमार्कमध्ये त्याच शैलीचा अधिक ठळक आणि संक्षिप्त अवतार पाहायला मिळतो. नव्या फॉन्टमध्ये ‘एस’, ‘आर’ आणि ‘जी’ या अक्षरांना वळणदार स्वरूप देण्यात आले आहे. मात्र, याच कारणामुळे सोशल मीडियावर काही वापरकर्त्यांनी नव्या वर्डमार्कची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे.
काही वापरकर्त्यांना नव्या फॉन्टमधील ‘आर’ हे अक्षर ‘झेड’सारखे दिसत असल्याचे वाटत आहे. त्यामुळे काही जण ‘इन्स्टाग्राम’ऐवजी ‘इन्स्टागझॅम’ असे वाचत असल्याचे विनोदी पोस्टमधून सांगत आहेत. काहींनी तर या नावाचे ‘इन्स्टाग्वान’ आणि ‘इन्स्टाग्वाम’ असे मजेशीर पर्यायही सुचवले आहेत. मात्र, या टीकेसोबतच अनेक वापरकर्त्यांनी नव्या वर्डमार्कच्या स्वच्छ आणि आधुनिक रूपाचे कौतुकही केले आहे.
दरम्यान, या बदलात इन्स्टाग्रामच्या प्रसिद्ध रंगीत कॅमेरा आयकॉनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सध्या केवळ मजकुराच्या स्वरूपातील वर्डमार्कचे डिझाइन बदलण्यात आले आहे. इन्स्टाग्रामने २०१६ मध्ये शेवटचा मोठा डिझाइन बदल केला होता. त्यावेळी जुन्या तपकिरी कॅमेरा आयकॉनऐवजी रंगीत ग्रेडियंट असलेला सध्याचा आयकॉन आणण्यात आला होता. पुढील काळात आयकॉनमध्येही बदल केला जाणार का, याबाबत मेटाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule