
अमरावती, 15 ऑगस्ट (हिं.स.)
अमरावती शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी आणि विलास इंगोले मित्रपरिवाराच्या वतीने देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ऐतिहासिक जवाहर गेट, अमरावती येथे आज सकाळी ९.०० वाजता भव्य ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हजारो देशभक्त नागरिक, काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी व विद्यमान लोकप्रतिनिधी, युवक, महिला, माजी सैनिक तसेच विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींच्या उत्स्फूर्त उपस्थितीने संपूर्ण परिसर राष्ट्रभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला.
या भव्य सोहळ्यास मा. खासदार बळवंतभाऊ वानखडे, माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, अमरावती शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत,मनपा विरोधी पक्षनेते विलास इंगोले,माजी महापौर मिलिंद चिमोटे,प्रदेश सरचिटणीस किशोर बोरकर, महिला काँग्रेस अध्यक्षा जयश्री वानखडे,प्रदेश सचिव हाजी नजीर खान बी.के., युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष निलेश गुहे,युवक काँग्रेस अमरावती विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख, एन.एस.यू.आय.शहराध्यक्ष स्वराज पोटे यांच्यासह सेवादल विभाग,माजी सैनिक, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावर्षी स्वातंत्र्य दिनाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे ऐतिहासिक जवाहर गेटची करण्यात आलेली भव्य तिरंगा सजावट.जवाहर गेटपासून इतवारा बाजार ते अंबादेवी परिसरापर्यंत तिरंग्याच्या रंगांनी परिसर सजविण्यात आला होता.आकर्षक विद्युत रोषणाई,स्वातंत्र्यसंग्रामातील थोर स्वातंत्र्यसैनिक तसेच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या कार्याला उजाळा देणारे फ्लेक्स यामुळे संपूर्ण परिसराला ऐतिहासिक आणि राष्ट्रभक्तीपूर्ण स्वरूप प्राप्त झाले होते.
अमरावती शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे सर्व ज्येष्ठ नेते,पदाधिकारी,माजी व विद्यमान लोकप्रतिनिधी, नगरसेवक-नगरसेविका, फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी तसेच युवक काँग्रेस, एन.एस.यू.आय., महिला काँग्रेस, सेवादल, ओबीसी, एससी, एसटी, अल्पसंख्याक विभाग, सोशल मीडिया विभाग आणि विविध सेल व विभागांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या संपूर्ण कार्यकारिणीसह मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमरावती शहरातील नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेत हा राष्ट्रीय उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.यावेळी खासदार बळवंतभाऊ वानखडे यांनी उपस्थित नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना सांगितले की, अमरावतीच्या ऐतिहासिक परंपरेला जपत जवाहर गेट येथे एवढ्या मोठ्या प्रमाणावर पारंपरिक,सामाजिक आणि ऐतिहासिक स्वरूपाचा ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्याची परंपरा अमरावती शहर काँग्रेस कमिटीने जपली आहे. जवाहर गेटच्या ऐतिहासिक महत्त्वाला साजेसा भव्य सोहळा आयोजित केल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी