नांदेडमध्ये आधार सेवा केंद्र सुरू
आधार नोंदणीपासून दुरुस्ती व बायोमेट्रिक अपडेटपर्यंत विविध सुविधा एकाच ठिकाणी नांदेड, १५ ऑगस्ट (हिं.स.)। नांदेड शहरातील नागरिकांना आधारशी संबंधित विविध सेवा सुलभ आणि जलदगतीने एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी केंद्र शासन पुरस्कृत आधार सेवा केंद्
अ


आधार नोंदणीपासून दुरुस्ती व बायोमेट्रिक अपडेटपर्यंत विविध सुविधा एकाच ठिकाणी

नांदेड, १५ ऑगस्ट (हिं.स.)। नांदेड शहरातील नागरिकांना आधारशी संबंधित विविध सेवा सुलभ आणि जलदगतीने एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी केंद्र शासन पुरस्कृत आधार सेवा केंद्र वजीराबाद येथील महावीर चौक, मल्टीपर्पज हायस्कूलजवळ सुरू करण्यात आले आहे. राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग सक्षमीकरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी खासदार डॉ. अजित गोपछडे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, यूआयडीएआय मुंबईचे सहाय्यक व्यवस्थापक कुलदीप गहलोत आणि आधार सेवा केंद्राचे ऑपरेशनल मॅनेजर गंगाधर गिरी आदी उपस्थित होते.

आधारशी संबंधित कामांसाठी नागरिकांना वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागू नये, यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आधार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. महावीर चौक, मल्टीपर्पज हायस्कूल, बंदा घाट रोड, वजीराबाद येथे बीएलएस इंटरनॅशनल लिमिटेडच्या माध्यमातून हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.

या केंद्रामध्ये नवीन आधार नोंदणी, बंद किंवा निष्क्रिय झालेले आधार पुन्हा कार्यान्वित करणे, बोटांच्या ठशांशी संबंधित समस्या सोडविणे तसेच नाव, पत्ता, जन्मतारीख आणि मोबाईल क्रमांक यांसह विविध तपशीलांमध्ये दुरुस्ती व अद्ययावतीकरणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांना आधारशी संबंधित विविध सेवांबाबत आवश्यक मार्गदर्शनही या केंद्रातून मिळणार आहे.

मुलांचे बायोमेट्रिक अपडेट मोफत

५ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांचे अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट या केंद्रात करण्यात येणार आहे. ही सेवा ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत विनामूल्य उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.

याशिवाय, जन्मतारखेत किंवा नावामध्ये बदल करण्याची निर्धारित मुदत संपलेल्या व्यक्तींना तसेच आधार कार्ड तात्पुरते निलंबित किंवा निष्क्रिय झालेल्या नागरिकांनाही आवश्यक सेवा आता नांदेडमध्येच मिळणार आहेत. यासाठी यापूर्वी मुंबईतील संबंधित कार्यालयात जावे लागत होते.

नागरिकांचा वेळ आणि श्रम वाचणार

आधार हे विविध शासकीय योजना, बँकिंग सेवा, शैक्षणिक प्रक्रिया तसेच इतर नागरिक सेवांसाठी महत्त्वाचे ओळखपत्र आहे. त्यामुळे नागरिकांनी आधारमधील आपली माहिती अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. नवीन आधार सेवा केंद्रामुळे नागरिकांचा वेळ आणि श्रम वाचणार असून, आधारशी संबंधित आवश्यक सेवा व मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.

आधार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक नीरज धामणगावे यांनी सहकार्य केले.

------------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande