
नागपूर, १५ ऑगस्ट (हिं.स.) : नागपूर जिल्ह्याने सिंचन, आरोग्य, कृषी, सामाजिक कल्याण, महिला सक्षमीकरण, क्रीडा, पायाभूत सुविधा, पोलीस प्रशासन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. विविध विभागांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांमुळे नागरिकांना सुविधा उपलब्ध होत असून, नागपूरला देशातील अग्रगण्य आणि विकसित प्रदेश म्हणून घडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय समारंभात ध्वजारोहणानंतर ते बोलत होते. यावेळी खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार डॉ. राजीव पोतदार, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त संजय मीना, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, पोलीस सहआयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
लॉजिस्टिक्स, ऊर्जा आणि औद्योगिक विकासाचे केंद्र बनविण्याचे उद्दिष्टनागपूर आणि विदर्भाला लॉजिस्टिक्स, ऊर्जा, कृषी प्रक्रिया, माहिती-तंत्रज्ञान आणि औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र बनविण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. शिक्षण, कृषी, आरोग्य, क्रीडा, मिहान, महामेट्रो, रस्ते विकास, नागपूर स्पोर्ट्स हब, अंबोरा पर्यटन, रामटेक येथील चित्रनगरी, नवीन नागपूर व्यापार व वित्तीय केंद्र आणि स्टेट डेटा सेंटर यांसारख्या प्रकल्पांमुळे नागपूरच्या विकासाला व्यापक दिशा मिळत आहे.
२०४७च्या विकसित भारताच्या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी नागपूर आणि विदर्भाला देशातील समृद्ध व अग्रगण्य प्रदेश बनविण्याच्या दिशेने शासन, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या समन्वयातून विकासाची वाटचाल सुरू ठेवण्याचा संकल्प आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
सिंचन क्षेत्रात हजारो हेक्टरला लाभ
सिंचन क्षेत्रातील प्रगतीचा आढावा देताना पालकमंत्र्यांनी चिचघाट उपसा सिंचन योजनेतून ३ हजार ७१५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले असल्याचे सांगितले. खैरी कालव्याच्या विशेष दुरुस्तीमुळे ४७३ हेक्टर सिंचन क्षमता पुनर्स्थापित झाली आहे. तसेच भिड-चिचघाट योजनेतून ९ हजार ६४० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत ६८ ‘आपला दवाखाना’ केंद्रांमधून नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून ९३ हजार ९१४ रुग्णांवर ३०७ कोटी रुपयांचे मोफत उपचार करण्यात आले आहेत. जिल्ह्यात ३ लाख ३८ हजार २९५ आयुष्मान कार्डांचे वितरण करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील ६० आरोग्य केंद्रांना एनक्यूएएस मानांकन मिळाले असून, १५ स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. तसेच ६० एआय अंगणवाड्यांमुळे नागपूर हा देशातील पहिला जिल्हा ठरला असून, या उपक्रमामुळे कुपोषणात घट झाल्याचा उल्लेखही करण्यात आला.
एआय आधारित स्मार्ट पोलिसिंगवर भर
नागपूर शहर पोलिसांकडून एआय आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट पोलिसिंगचा वापर केला जात आहे. नागपूर ग्रामीण पोलिसांनीही एआयच्या सहाय्याने गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळविले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे पोलीस प्रशासन अधिक सक्षम आणि गतिमान होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून ‘नवीन नागपूर’ प्रकल्पासाठी जमीन संपादन आणि निधीच्या कामाला गती देण्यात आली आहे. बाह्य वळण रस्ता प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू आहे. महामेट्रोच्या टप्पा-३च्या ५५ किलोमीटर विस्तारासाठी डीपीआर आणि आराखडा तयार करण्यात आला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हायब्रिड ऍन्युइटी योजनेतून ८६५ कोटी रुपयांच्या २४० किलोमीटर रस्त्यांच्या कामांना गती देण्यात आली आहे.
शेतकरी आणि महिलांसाठी महत्त्वाचे निर्णय
खरीप २०२६ मध्ये ७६ हजार ४७६ शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे. राज्यातील ३१ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी तसेच शेतीपंपांच्या वीजबिलमाफीचाही पालकमंत्र्यांनी उल्लेख केला.
महिलांना शेतकरी दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या शिबिरांमधून महिलांना शेतकरी कार्डचे वाटप करण्यात आले आहे. यामुळे महिलांना बँक कर्ज तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिलांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
जलसंधारण दिनानिमित्त राज्यव्यापी कार्यक्रम
मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने २१ ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त राज्यव्यापी ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ यासह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ मधील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना कर्ज निरंक प्रमाणपत्र आणि कर्ज वितरण मंजुरी पत्र पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
यामध्ये नोकेश्वर मारोतराव लंगडे आणि बेबीताई वानखेडे यांना कर्ज निरंक प्रमाणपत्र, तर धनराज डोमाजी गौळकर आणि लोकेश भोयर यांना कर्ज मंजुरीचे पत्र प्रदान करण्यात आले.
नागपूरच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विभागांमध्ये सुरू असलेली कामे आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी यामुळे जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळत असून, आगामी काळात नागपूरला देशातील अग्रगण्य विकासकेंद्र बनविण्याचा शासनाचा प्रयत्न राहणार असल्याचे बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केले.--------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी